(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नामांतराला विरोध करणाऱ्या अबु आजमींना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
Abu Azmi: मुंबई पोलिसांनी एक आरोपी नाशिक आणि आणखी दोघांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे.
Crime News: औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबु आजमी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एक जण नाशिक तर दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
अबु आजमी यांच्या खाजगी सचिवांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अबू आजमी यांनी सभागृहात विरोध केला होता. त्यामुळे त्यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुण्यातून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी नाशिकचा असल्याची माहिती समोर आली आहे .रात्री एक वाजता मुंबई पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांना थोड्याच वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
छातीमध्ये गोळया घालू..
अबू आजमी यांच्या खाजगी सचिवाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, एका अज्ञात व्यक्तीने फोन करून, अबू आजमी यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांमराचा विरोध का केला अशी विचारणा केली. त्यांनतर, कुठे आहे तो त्याच्या छातीमध्ये गोळया घालून मारून टाकायच असल्याचा म्हणाला. तसेच पुढे बोलताना म्हणाला की, तुम्ही काहीही करू शकत नाही. विरोध केला तर आम्ही मारून टाकू आणि खूप गलिच्छ भाषेत अबू आझमी यांना शिवीगाळ केल्याचा तक्रारीत म्हटले आहे.
काय म्हणाले होते अबु आझमी...
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनंदनपर भाषणात अबू आझमी यांनी नामांतरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांनी जाता जाता औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र, शहरांची नावे बदलून विकास होतो का? बेरोजगारांना रोजगार, विकास होत असेल, तर आमचा आमचा विरोध नाही. नाव बदलून काय संदेश देणार आहात? मुस्लिमांची नावे हटवून काय संदेश देणार आहात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. जुन्या शहरांची नावे बदलून काय करणार, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने शहर वसवा, टाळ्या वाजवून स्वागत करू, असे अबू आझमी म्हणाले होते.