Aaditya Thackeray : यशवंत जाधव यांच्या डायरीतील 'मातोश्री' उल्लेखावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले...
Aaditya Thackeray : यशवंत जाधवांच्या डायरीतील मातोश्री नेमक्या कोण? असा प्रश्न विरोधकांकडून सातत्यानं विचारला जात आहे. यावर आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aaditya Thackeray : सध्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवायांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहे. अशातच सध्या एक प्रकरण चर्चेत आहे, ते म्हणजे, शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर करण्यात आलेली आयकर विभागाची कारवाई. आयकर विभागानं यंशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यावेळी आयकर विभागानं त्यांच्या घरून काही वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. यामध्ये एक डायरी होती. यशवंत जाधव यांच्या डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटी दिल्याची नोंद असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. यावरुन यशवंत जाधवांच्या डायरीतील मातोश्री नेमक्या कोण? असा प्रश्न विरोधकांकडून सातत्यानं विचारला जात आहे. यावर आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यशवंत जाधवांच्या डायरीतील मातोश्री उल्लेखावर प्रश्न विचारला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं यापुरतं मी मर्यादित ठेवतो. असं आदित्य ठाकरे म्हणाले. "आत्ताच्या काळात अफवा किती पसरवल्या जात आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. खूप गैरप्रकार सुरु आहे. यंत्रणा तर आहेत, पण अफवांच्या बातम्या पाठवल्या जात असून त्यात मी जाणार नाही. अधिकृत गोष्टी समोर येतील. पण बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी भाष्य करणार नाही."
पाहा व्हिडीओ : यशवंत जाधव यांच्या 'मातोश्री' च्या उल्लेखावर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
हे राजकीय षडयंत्र : आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, "हे राजकीय षडयंत्र आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपाचं सरकार नाही. तिथे या गोष्टी सुरु आहेत. ना घाबरता या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे. बंगाल, महाराष्ट्र जिथे जिथे यंत्रणा मागे लागत आहेत तिथे तोंडावर पडत आहेत. राजकारण एके ठिकाणी पण जे घाणेरडं राजकारण सुरु आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. लोकं सरकार बनवत असतात, पाडत असतात पण जे नैराश्य येतं त्यातून हे सुडाचं राजकारण सुरु असून महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे."
"गेल्या दोन अडीच वर्षात ज्याप्रकारे भाजपा सर्व पक्षांना वागणूक देत असल्याचं पाहिलं आहे. वाढती महागाई, बेरोजगारी लपवण्यासाठी यंत्रणा तसंच हे विषय समोर आणले जात आहेत का? हादेखील प्रश्न आहे. हे राजकारणापेक्षा मोठे विषय असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामं, विकास करत राहणं गरजेचं आहे.", असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. भाजपासोबत पुन्हा मैत्री होण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल, जोर जबरदस्ती करत असेल तर मैत्री करणार का?" असा प्रतिप्रश्नच आदित्य ठाकरेंनी विचारला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :