Oxygen Leakage | परभणीत नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली, 14 रुग्णांचा जीव वाचला
परभणीत नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली. वादळी वाऱ्याने रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपलाईनवर झाड कोसळले होते. यामुळे झालेली ऑक्सिजन गळती वेळीच लक्षात आल्याने यंत्रणा हलली. सामाजिक कार्यकर्ते आणि खासदारांच्या तत्परतेने 14 रुग्णांचा वाचला जीव. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रे यांनी घटनेचा आढावा घेतला.
परभणी : वादळी वाऱ्याने परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपलाईनवर झाड कोसळले आणि ऑक्सिजन गळतीला सुरुवात झाली. ही बाब तेथे उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ तत्परता दाखवत ऑक्सिजन पुरवठा बंद केला आणि खासदारांना घटना कळवली. यानंतर खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रकार सांगितला. यंत्रणा हलली अन् तब्बल 14 रुग्णांचे प्राण वाचले, त्यामुळे नाशिक येथील घटनेची पुनरावृत्ती परभणीत टळली. दरम्यान या घटनेननंतर जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती.
परभणीत काल (27 एप्रिल) रात्री साडे अकराच्या सुमारास वादळी वारा सुटला होता. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभाग आणि रक्तपेढी यांच्यामध्ये असलेल्या ऑक्सिजन पाईपलाईनवर निलगिरीचे झाड कोसळले आणि त्यामधून ऑक्सिजन गळती सुरु झाली. हा प्रकार तिथे उपस्थित असलेले शंकर नाईकनवरे यांना कळला. त्यांनी तात्काळ ऑक्सिजन पुरवठा बंद केला आणि ही बाब खासदार संजय जाधव यांना फोनवरुन कळवली. खासदारांनीही क्षणाचा विलंब न लावता सिव्हिल रुग्णालय गाठले आणि ही बाब जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना कळवली. त्यांनीही लगेच जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि यंत्रणा हलली. जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत अपघात विभागात उपचार घेत असलेल्या 14 रुग्णांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रुग्णालयातील स्टाफने ऑक्सिजन सिलेंडर लावले होते, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. सर्व 14 रुग्णांचे प्राण वाचले. घटनेची माहिती कळताच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्हिडीओ कॉलवरुन आढावा घेतला, तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही फोनवरुन घटनेची माहिती घेतली.
सर्व अधिकाऱ्यांनी रात्र काढली जागून
रात्री साडे अकरा वाजता घटना घडल्यानंतर खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर,जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टांकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी चार वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे जवान, फेब्रिकेटर वर्कर, गॅस पाईपलाईन दुरुस्त करणारे कामगार यांच्या मदतीने हे झाड पूर्णपणे हटवून ऑक्सिजन पाईपलाईन पूर्ववत करुन घेत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करुन घेतला आणि मग जिल्हा सामान्य रुग्णालय सोडले. या सर्व गंभीर प्रकारात अधिकारी आणि नेत्यांनी रात्र जागून काढली.