तुळापूर-वढूमधील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 397 कोटींचा विकास आराखडा मंजूर; आराखड्यावर 'स्वराज्यरक्षक' ऐवजी 'धर्मवीर' उल्लेख
Maharashtra News: तुळापूर-वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या आराखड्यात मोठा बदल करण्यात आला आहे. स्वराज्यरक्षक हा शब्द काढला आहे. त्याठिकाणी आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख करण्यात आला आहे.
Maharashtra News : तुळापूर-वढू (Tulapur- Vadhu) येथील छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या स्मारकाच्या आराखड्यात मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वीचा स्वराज्यरक्षक असा उल्लेख वगळून धर्मवीर असा उल्लेख करण्यात आला आहे. पूर्वी या विकास आराखड्याचे नाव 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ असे होते. मात्र ते आता ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ असे करण्यात येणार आहे. स्मारकाच्या 397 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. विकास आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (14 फेब्रुवारी) मंजुरी देण्यात आली.
2022 चा अर्थसंकल्प माजी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडला होता. त्या अर्थसंकल्पाची सुरुवातच स्वराज्यरक्षक संभाजीराजे अशी होती. तुळापूर-वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाचे जतन करण्यासाठी महाविकास आघाडी सरकाने काही घोषणा केल्या होत्या. मात्र मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत स्वराज्यरक्षक हा शब्द काढला आहे. त्याठिकाणी आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराजरक्षक असा उल्लेख केला होता. त्यावर आक्षेप घेत भाजपने छत्रपती संभाजी महाराज हे धार्मिक नायक असल्याचे सांगत अजित पवारांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु केले होते.
तुळापूरसाठी काय?
तुळापूर येथील विकासकामांवर 158 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे क्षेत्रफळ 8 एकर असून त्यात रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, गॅलरी, कार्यालय, संग्रहालय, वाहनतळ, स्वच्छतागृह, प्रवेशद्वार आदी सुविधा पुरवल्या जाणार आहे. शनिवारी आणि रविवारी 10 ते 15 हजार लोक स्मारकाला भेट देतील असा अंदाज आहे.
वढू बुद्रुकसाठी काय?
वढू बुद्रुक विकासासाठी 110 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. मंदिर, पार्किंग, संग्रहालय, स्मारकाचे प्रवेशद्वार आदी सुविधा असणार असून दर शनिवार आणि रविवारी इथे 4 ते 5 हजार नागरिक भेट देतात. वढू बुद्रुक येथील 4 एकर क्षेत्राच्या विकासासाठी 110 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिल्प, कवी कलश समाधी, मेघडंबरी असेल.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
- राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात 816 शाळा विकसित करणार (शालेय शिक्षण विभाग)
- धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. 1 हजार कोटी निधीस मान्यता. 5 लाख शेतकऱ्यांना लाभ (अन्न व नागरी पुरवठा विभाग).
- डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).
- महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत (सार्वजनिक आरोग्य विभाग).
- पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे 787 कोटी खर्चास मान्यता. 7690 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार (जलसंपदा विभाग).
- पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण. छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी 397 कोटी 54 लाख खर्चाचा विकास आराखडा.
- जेजुरीसाठी 127 कोटी 27 लाखाचा विकास आराखडा. सेवाग्राम विकासासाठी 162 कोटींचा विकास आराखडा
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदन केले. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव.
VIDEO : Chhatrapati Sambhaji Maharaj Smarak : तुळापूर वढूमधील स्मारकासाठी 397 कोटींच्या विकास आराखाड्याला मंजुरी