नाशिकच्या ओझरमधील बैलगाडा शर्यत थांबवली, कोरोनाचं पालन होत नसल्यानं शर्यत बंद
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी नाशिक येथे पहिल्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले.
नाशिक : बैलगाडा शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटविल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बिना परवानगी शर्यतीचे आयोजन केले. मात्र सर्वच नियम धाब्यावर बसवून सुरू झालेली पहिलीच बैलगाडा शर्यत थांबविण्याचा निर्णय घेतला असून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी पहिल्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले. मात्र बैलगाडा शर्यतीला पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची परवानगीच नव्हती. मोठ्या उत्साहात आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ शेतकरी आपल्या सर्जाराजासह जमा झाले. माजी आमदारांनी नारळ फोडला मानाची पहिली गाडी पुकारली त्यावर माजी आमदार स्वतः स्वार झाले. मात्र थोडयाच वेळात पट्टीवर धावणारी बैलजोडी बघ्याच्या गर्दीत शिरली एकदोन जण जखमी झाले, एक पाठोपाठ एक नियमचें उल्लंघन होत गेले. घोडा आणि बैल यांच्या शर्यतीला मनाई असताना तिथेही स्पर्धकांनी नियम धाब्यावर बसवले. विना परवानगी सुरू असणारी बेलगाम शर्यतीची माहिती पोलिसांपर्यत पोहचताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शर्यत बंद पाडली. ओमायक्रॉनच्या सावटामुळे राज्य सरकारने बारा तासापूर्वी घालून दिलेल्या नियमाचे ही पालन झाले नाही. कुठेच सोशल डिस्टसिंग नाही, तोंडाला मास्क नाही, त्यामुळे शर्यत बंद करण्याचा निर्णय झाला.
पोलीसांची पाठ फिरताच पुन्हा काही वेळासाठी शर्यत सुरू करण्यात आली होती. ओझर विमानतळ रस्त्याला लागून ही शर्यत होती. कायम पोलिसांची गस्त असते दोन दिवसांपासून तयारी सुरू होती. सोशल मीडियावर शर्यतीची माहिती दिली जात होती, तरी स्थानिक पोलिसांना विना परवानगी सुरू असणाऱ्या शर्यतीबाबत माहिती कशी मिळाली नाही. जर माहिती होती तर वरिष्ठांना यांबाबत कल्पना का दिली नाही, आधीच कारवाई का केली असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे विनापरवागी बेकायदेशीर शर्यत काढणारे जसे दोषी आहेत तसेच त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे स्थानिक पोलीस प्रशासन ही तेवढेच दोषी आहेत त्यामुळे सरकार काय पावले उचलतात याकडे लक्ष लागलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :