Rain News : मुंबईसह राज्यभरात पावसाचे धुमशान, मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत; पुढचे 48 तास महत्त्वाचे
Maharashtra Rain Update : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : राज्यभरात धुवाधार पाऊस सुरू आहे. मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
मुंबईतील सखल भागात पाणी साचलं आहे. पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे.तर लोकल वाहतूकही उशिराने सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे आणि कोकणात पुढील 48 तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain News : शाळांना सुट्टी जाहीर
खबरदारीच्या पार्श्वभूमी ठाणे, नवी मुंबई आणि बुलढाण्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुलढाण्यातील चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे फक्त या दोन तालुक्यातील शाळा उद्या बंद राहणार आहेत. दरम्यान पावसाचे अलर्ट लक्षात घेऊन उद्या शाळांना सुट्टी देण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
Marathwada Rain Today : मराठवाड्यात 6 जणांचा मृत्यू
मराठवाड्यात धुवाधार पावसामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये नांदेड 3, बीड 2, हिंगोलीत 1 जणाचा मृत्यू झाला. तर मराठवाड्यातील 57 महसूलमंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु झाला. मुखेड तालुक्यात पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला. नांदेडमध्ये 4 ते 5 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पूरात अडकलेल्यांना एसडीआरएफरच्या टीमने बाहेर काढलंय.
Buldhana Rain : बुलढाण्यामध्ये अतिवृष्ठी, शाळा बंदचा निर्णय
बुलढाण्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. आज आणि उद्या तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे.
या अतिवृष्टीमुळे शहर आणि तालुक्यात बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले काठाच्या बाहेरून वाहत आहे. मन प्रकल्पाचे सर्व पाच दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून मन नदीकाठच्या गावांना व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Hingoli Rain News : हिंगोलीत नदी-नाल्यांना पूर
हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने ओढे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे. विदर्भात होत असलेल्या पावसाचे पाणी हिंगोलीच्या ईसापूर धरणात येत आहे. त्यामुळे ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. याच पैनगंगेने रौद्ररूप धारण केल्याचे बघायला मिळत आहे.
Raigad Rain Update : रायगडमध्ये अनेक भागात पाणी साचलं
रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून महाड मधील सखल भागात पाणी साचले आहे. महाड पोलादपूरच्या काही सकल भागांमध्ये पाणी साचल्याचे प्रकार दिसून येतोय. महाड शहरातील काही शाळांच्या पटांगणात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना भर पावसात चिखलामध्ये तालुका क्रीडा स्पर्धांची तयारी करावी लागत आहे.
ही बातमी वाचा:
























