Maharashtra Rain: राज्यात पावसाचं धुमशान; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर
Maharashtra Mumbai Rain Updates: राज्यात येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ज्या ठिकाणी पूर परिस्थितीची शक्यता आहे त्या ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.
Maharashtra Mumbai Rain Updates: गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे राज्यभरातील अनेक नाल्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे तर नद्या या दुथंडी भरून वाहत आहेत. राज्यात आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. त्यामुळे काही मार्ग बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
बुलढाण्यात सरासरी 636 मिलिमीटर पाऊस तर 19 मंडळात अतिवृष्टी (Buldhana Rain Update)
बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यात 636 मिलीमीटर पाऊस झालाय तर 19 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मलकापूर नळगंगा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती, तर मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे घराचे भिंत पडल्याने चार जनावरांचा मृत्यू झाला आहे, आणि नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथील मंदिराची भिंत कोसळून नामदेव गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांचा मुलगा शुभम गावंडे हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मलकापूर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस
बुलढाण्यातील मलकापूर या ठिकाणच्या राष्ट्रीय महामार्ग क्र 06 वर पावसाचं पाणी आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मलकापूर नजिक कुंड गावाजवळ शेतातील पाणी महामर्गावर आल्याने वाहतूक दोन तासांपासून ठप्प झाली होती. मलकापूर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी नाल्याना पूर आला आहे.
कोल्हापुरात राजाराम बंधारा पाण्याखाली, हिरण्येकेशी पुलावर पाणी (Kolhapur Rain Update)
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे राजाराम बंधाऱ्यासह नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच हिरण्येकेशी नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नदीवरील पुलावर पाणी आलं आहे.
येत्या 48 तासांमध्ये कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 14 धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
वाशिममध्ये नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला (Washim Rain Update)
वाशिम जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरूळपीर तालुक्यात अनेक गावात जनजीवन विस्कळीत झालं आहे तर नदीकाठचे गावांचा संपर्क तुटला आहे तर मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
अकोला जिल्ह्यातही मुसळधार पाऊस
अकोला जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसाने मोठा हा:हाकार उडालीय. या पावसाचा सर्वाधिक फटका मुर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालूक्याला बसलाय. मुर्तिजापूर तालूक्यातील खरब ढोरे, चिखली, दाळंबी, कोळंबीसह बार्शीटाकळी तालूक्यातील मोर्हळ गावाला या गावांना पुराचा मोठा फटका बसलाय. अकोल्यातही अनेक सखल वस्त्यांमध्ये पुराचं पाणी घुसलंय.
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्ठी (Jalgaon Rain Update)
जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील अतिवृष्टी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जोरदार आणि मोठ्या प्रमाणावर झालेज्या या पावसामुळे सुकी नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे रावेर तालुक्यातील विवरे गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. या पुराच्या पाण्यात एक चार चाकी आणि पुनगाव येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने मोठी दाणादाण उडाली आहे.
साताऱ्यात अंबेनळी घाटात दरड कोसळली
साताऱ्याच्या अंबेनळी घाटात पाच ठिकाणी दरड कोसळली. कुंबळवणे, चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळलीय. काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळलीय. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला आहे. तर महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. वेण्णा नदीचे पाणी पाचगणी रोडवर आले आहे.
चंद्रपुरात मुसळधार पाऊस, शाळा महाविद्यालयांना सुट्टी (Chandrapur Rain Update)
चंद्रपूर शहरात काल तब्बल 260 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 4 जुलै 2006 मध्ये 230 मिमी पाऊस झाला होता. या पावसामुळे चंद्रपूर शहरातील मच्छी नाला परिसर, आझाद बगीचा आणि बिनबा गेट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं होतं. दुपारी 4:30 पासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने पावसाचं पाणी उतरलं आहे. मात्र हवामान खात्याने आजदेखील चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
हिंगोलीमध्ये कालपासून पाऊस, पिकांचं नुकसान
हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील लोहगाव शिवारात असलेल्या ओढ्याचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतातील सोयाबीन, हळद, कापूस यासह अन्य पिकांचं या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. अगोदरच दुबार पेरणीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यासमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे.
पालघरमधे पावसाचा जोर (Palghar Rain Update)
पालघर जिल्ह्यातील रायते पूल पूर्णपणे पाण्यात बुडाला असून कल्याण मुरबाड मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी पाऊसाचा जोर खूप वाढला आहे.
रत्नागिरीत परशुराम घाटातील रस्त्यावर माती जमा
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे चिपळूणमधील परशुराम घाटातल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती जमा झाल्याचं चित्र आहे. यामुळे वाहतूक खोळंबलीये. तर, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीये
ही बातमी वाचा: