Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राडगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील साडेतीनशे वर्षे पुरातन झाड कोसळले
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
LIVE
Background
Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राज्याच्या काही भागात पावसानं कहर केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तिथे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहर
राज्यात विविध ठिकाणी चांगलाच पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे. भामरागड-आलापल्ली मार्गावरील अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे. त्यापैकी तूमर्गुंडा नाल्यावर पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं या परिसरातील लोकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. या नाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, या भागातील लोक आपला जीव मुठीत धरुन पुराच्या पाण्यातून मोटार सायकल खांद्यावर घेऊन या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करत आहेत. तर दुसरीकडे चंद्रा गावाजवळील नाल्यावरुन देखील पाणी वाहत होते. दरम्यान, पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूरमध्ये दमदार पाऊस
नागपूरमध्येही दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळं एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद पडली. यावेळी वाहन चालक अडकून पडू नये, म्हणून स्थानिक नागरिक तसेच तरुण लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांनी एका बाजूची वाहतूक बंद करत येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना रस्ता दाखवत मार्ग काढून देण्याचे काम केले.
यवतमाळ जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी
गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं अनेक नदी नाले दुथडी भरुन ओसंडून वाहत आहे. राळेगाव तालुक्यातील लाडकी गावात मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे.
चंद्रपूर पाऊस
मुसळधार पावसाने चंद्रपूरला देखील झोडपले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. जिल्ह्यातील जीवती- पोंभूर्णा -गोंडपिपरी- वरोरा- मूल या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जलमय स्थिती झाली आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवर पाणीच पाणी आहे. महत्त्वाच्या वाहतूक शाखा टी पॉईंटवर नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा आला आहे. हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला 72 तासांचा रेड अलर्ट दिली आहे.
वाशिम आणि वर्ध्यातही जोरदार पाऊस
वाशिम जिल्ह्यातही सकाळपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाला सुरुवात झाली आहे. तर वर्धा जिल्ह्यात 10 ते 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होईल असा अंदाज सांगण्यात आला आहे. या काळात वर्धा जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलं आहे.
दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारी 12 ते 15 जुलै पर्यंत वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
12 जुलै ते 15 जुलै या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनाऱ्यावर ताशी 45-55 कि.मी ते 65 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. याबरोबरच 12 जुलै ते 15 जुलै या कालावधीत रत्नागिरीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Raigad News Update : राडगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील साडेतीनशे वर्षे पुरातन झाड कोसळले
पोलादपूर येथील उमरठ मधील शिवकालीन ऐतिहासिक साक्ष असलेले साडेतीनशे वर्षे पुरातन आंब्याचे झाड कोसळे आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगणारे हे झाड होते. परंतु, मुळधार पावसामुळे हे झाड कोसळले आहे. तानाजी मालुसरे यांच्या स्मारक परिसरातच हे आंब्याचे झाड होते.
पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील कर्मभूमीतील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारक परिसरात सुमारे साडेतीनशे वर्षे पुरातन आंब्याचे झाड होते. परकियांचे हल्ले होत असत त्यावेळी या आंब्याच्या ढोलीमध्ये मावळे तलवारी आणि हत्यारे लपवित असल्याचे माहिती सांगितली जाते.
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय
नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर येथील व आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खळखळून प्रवाहित झालाय. गेल्या 4 महिण्यापासून पाणी नसल्याने बंद पडलेला हा प्रसिद्ध ऐतिहासिक धबधबा मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहतो.
पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना
Nagpur : गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले. विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांनी त्यांना विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला. त्यानंतर खराब हवामानामुळे हेलिकॅप्टर ऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले.
Aurangabad: औरंगाबादसह जालना जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
Aurangabad Rain Update: हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या दोन दिवस औरंगाबादसह जालना जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यात सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि नदी काठच्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.