Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, काही ठिकाणी वीज पडल्याची घटना
मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच राज्याच्या विविध भागातही जोरदार पाऊस झाला आहे.
Maharashtra Rain News : सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रात्री झालेल्या वादळी पावसामुळं अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखील झाल्या आहेत. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडं उन्मळून पडली असून, वीजेचं खांब देखील पडले आहेत.
राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, अहमदनगर, परभणी, चंद्रपूर, वाशिम अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
परभणीत पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंद
परभणी जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. परभणी, पाथरी, पूर्णा, मानवत, पालम आणि जिंतुरात पाऊस झाला. यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार निर्माण झालं आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह सर्वत्र पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून परभणीकरांना दिलासा मिळाला आहे. संध्याकाळी 9 च्या सुमारास परभणी शहरासह पाथरी, पूर्णा, मानवत, पालम आणि जिंतुर तालुक्यात जोरदार पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांसह सामन्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोल्यात पावसाचा जोर, लाखो रुपयांचं सिमेंट आणि खतांची पोती भिजली
अकोल्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं दक्षिण मध्य रेल्वेच्या शिवापूर स्थानकावर लाखो रुपयांचं सिमेंट आणि खतांची पोती भिजलीत. यामध्ये व्यापाऱ्यांचे 30 ते 40 लाखांचं नुकसान झालं आहे.
चंद्रपूरमध्ये वीज पडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, तर अकोल्यात जनावरं दगावली
शेतात काम करीत असताना वादळी वाऱ्यासह वीज पडून एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर 5 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील दिंदोडा शेत शिवारात ही घटना घडली. सोहम हरिदास काळे (20) असे मृताचे नाव आहे. दुपारच्या दरम्यान वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झाला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्व मजुरांनी शेतात असलेल्या एका झाडाखाली आश्रय घेतला. त्याच दरम्यान वीज पडून अपघात झाला. जखमींना तातडीनं वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अकोला शहरातील एमआयडीसी भागातील फेज क्रमांक तीनमधील अमरिश दालमिल परिसरात विज पडली. यामध्ये आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
वाशिमच्या आडोळी गाव परिसरात ढगफुटी सदृश स्थिती
वाशिमच्या आडोळी गाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या शेतीचे बांध फुटून शेताबाहेर पाणी वाहत होते. वाशिम ते आडोळी रस्त्याचं काम संथ गतीने काम सुरु असून नवनिर्मित पुलाच्या कामा वरुन पाणी वाहत होत.
अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस
अहमदनगर शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. जेऊरला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. या पावसामुळं सखल भागात पाणी साचले. पवसामुळं नगर- औरंगाबाद महामार्गावरील वाहतूकीचा वेग मंदावला होता.
यवतमाळमध्ये नुकसान
उमरखेड तुलुक्यातील नारळी गावामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नारळी गावातील नागरिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसासोबत झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे लाईनचे पोल पडले. तसेच आनेक नागरिकांच्या घरावरील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे टीन पत्रे उडाले. वादळी वाऱ्यामुळे झाडे सुद्धा कोसळून पडली. या पावसामुळं नारळी गावाच्या नागरिकांचे खूप प्रमाणात नुकसान झाले.
बुलढाणा पाऊस
जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात सायंकाळी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने सोनाळा नदीला पूर आल्याने काही शेळ्या वाहून गेल्या. नेमक्या किती शेळ्या वाहून गेल्या याची अद्याप माहिती मिळाली नसून, मात्र पहिल्याच पावसानं नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळं शेतकरी मात्र सुखावला आहे.