Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम
राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
LIVE
Background
Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, राज्यातील इतर भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणीसाठी शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, मुंबई आणि उपनगरासह अहमदनगर, यवतमाळ, रायगड, औरंगाबाद या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.
सिल्लोड तालुक्यात समाधानकारक पाऊस
औरंगाबाद सिल्लोड तालुक्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला आहे. तालुक्यात जवळपास सर्वच मंडळामध्ये पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना आनंद झाला. तालुक्यातील अनेक नद्या पहिल्याच पावसात वाहू लागल्या आहेत.
रत्नागिरीत मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 24 जून 2022 ते 27 जून 2022 या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. 24 जून ते 28 जून 2022 रोजी दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40 ते 50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मच्छिमारांनी सदर कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत खचली; शेतकऱ्यांचे नुकसान
शुक्रवारी अहमदनगर जिलह्यातही चांगला पाऊस झाला. शिर्डी परिसरातही मुसळधार पाऊस झाला. या पावसानं शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी कोसळल्याची घटना घडली आहे. संरक्षक भिंतीच्या निकृष्ठ कामाचे पितळ यामुळे उघडे पडले असून रन वे वरील वाहून जाणारे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत कोसळून कोसळून रन वे वरील पाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या शेती आणि वाड्या वस्त्यांमध्ये घुसल्यानं शेताकडे आणि घरांकडे जाणाऱ्या रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतातील विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात माती गेल्याने विहिरी बुजण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभी पिके वाहून गेली असून शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विमानतळ प्राधिकरणाने याची जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
एकीकडं हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडं राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची चांगलीच रिपरिप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून चांगलीच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. पावसामुळं तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातही चांगला पाऊस
गडचिरोली जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 8.9 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. उत्तर आणि दक्षिण गडचिरोली भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा रिमझिम पाऊण पडत आहे. जिल्ह्यात 1 जून ते 25 जूनपर्यंत 85.9 मीलीमीटर इतका पाऊस पडला आहे
गेल्या 24 तासात आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळं 10 जणांचा मृत्यू
Flood Situation in Assam : आसाम (Assam) राज्यात पुरानं हाहाकार घातला आहे. पुराच्या पाण्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं लाखो लोक बेघर झाले आहेत. जवळपसा 45 लाखाहून अधिक नागरिकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. तसेच मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी भूस्खलन देखील झालं आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात या पुरामुळं आणि भूस्खलन झाल्यामुळं आसाममध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आत्तापर्यंत मृत्यूचा आकडा हा 117 वर पोहोचला आहे.
पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस, मात्र पूर्व भाग चिंतेत
पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागात काल चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पूर्व भाग समजला जाणारा जव्हार, मोखाडा तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे
यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
यवतमाळ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह धुव्वाधार पावासानं हजेरी लावली. जवळपास एक तास पाऊस कोसळल्यानं पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीला म्हणावी त्या प्रमाणात सुरुवात केली नाही.आताच्या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला असून, आता पेरणीच्या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत.