CM Eknath Shinde : "...म्हणून आमदारांना भेटण्यासाठी मध्यरात्रीच गोव्यात पोहचलो" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना
Eknath Shinde in Goa : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट गोवा गाठलं, आणि आपल्या आमदारांची भेट घेतली
Maharashtra Government formation : ठाकरे सरकार पडल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी काल शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. गुरूवारी राजभवनमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
म्हणून मध्यरात्री गोवा विमानतळावर पोहचलो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट गोवा गाठलं, आणि आपल्या आमदारांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना गोव्याच्या ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे त्या हॉटेलमध्ये एबीपी माझाचा कॅमेरा पोहचला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मध्यरात्री सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केलं. यावेळी पेढे वाटण्यात आले. माझ्यासोबत असणाऱ्या 50 आमदारांच्या विश्वासामुळे आजचा दिवस उगवला असून तो अनपेक्षित असा आहे असं राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाचा फायदा या सरकारला होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझाशी बोलत होते. ज्या आमदारांमुळे मला मुख्यमंत्रीपद मिळालं त्या आमदारांना पहिल्यांदा भेटायला येणं कर्तव्य आहे. आणि म्हणून मध्यरात्री गोवा विमानतळावर पोहचलो असल्याची भावना महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केली आहे.
शिवसेनेच्या 39 आमदारांना हाताशी घेत बंडखोरी
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना हाताशी घेत बंडखोरी केली. त्यानंतर आता भाजपशी हात मिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. अखेर बुधवारी उद्धव ठाकरे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताली अशी घोषणा केली. त्यानंतर साताऱ्यामध्ये एकच जल्लोष सुरु झाला. कारण साताऱ्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्राला चौथ्यांदा मिळाला.
उद्धव ठाकरेंनी ट्विट करत एकनाथ शिंदेना शुभेच्छा
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विधिमंडळात बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले होते. त्याला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आलं. पण कोर्टानं बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानं उद्धव ठाकरे त्याआधीच राजीनामा देऊन मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. मुख्यमंत्रिपदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा त्यांनी दिला. महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंनी ट्विट करत एकनाथ शिंदेना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही इच्छा
हे देखील वाचा -
- Eknath Shinde : फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं: एकनाथ शिंदे
- Eknath Shinde CM: मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे पण सरकारचा रिमोट देवेंद्र यांच्या हाती?
- Uddhav Thackeray : सरकार पाडण्याबाबत उद्धव ठाकरे यांना दुर्लक्ष करणं नडलं? शिंदे यांच्या बंडखोरीची पवारांनी दिली होती चार वेळा माहिती