Sale Of Wine In Supermarket : राज्य सरकारने किराणा दुकान, मॉलमधून वाइन विक्रीपूर्वी जनतेकडून मागवल्या हरकती
Sale Of Wine In Supermarket : वाईन विक्रीच्या निर्णयाची अंमबलबजावणी करण्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 जूनपर्यंत राज्यातील जनतेकडून हरकती, सूचना मागवल्या आहेत.
Sale Of Wine In Supermarket : राज्य सरकारने किराणा दुकान, मॉलमधून वाइन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमबलबजावणी करण्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 जूनपर्यंत राज्यातील जनतेकडून हरकती, सूचना मागवल्या आहेत. जाणून घेऊया सविस्तर
राज्यातील जनतेकडून हरकती, सूचना मागवल्या
सहज वाइन उपलब्ध होत राहिल्यास सर्वसामान्यांची मुले व्यसनाच्या आहारी जातील. शासनाने महसूल वाढीसाठी घेतलेला निर्णय जनतेच्या हितविरोधी असल्याने अनेक सामाजिक संघटनाही याविरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आता शासनाने राज्यातील जनतेकडून हरकती, सूचना मागवल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचना पाहून या निर्णयाची अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
वाइन विक्री करण्यास कडाडून विरोध
विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी किराणा दुकानातून वाइन विक्री करण्यास कडाडून विरोध केला आहे. जनतेचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने सामान्य नागरिकांना सूचना आणि हरकती दाखल करण्यासाठी स्वतंत्र ई-मेल उपलब्ध करून दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने राज्य शासनाच्या वाइन विक्री निर्णयावर कडाडून टीका केली होती.
ई-मेल, टपालाने पाठवा हरकती
हरकती व सूचना दाखल करण्यासाठी dycomm-inspection@mah.gov.in या ई-मेलवर अथवा आयुक्त राज्य उत्पादन शुल्क दुसरा मजला, जुने जकात घर शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई 400023 या पत्यावर टपालाद्वारे पाठवण्याचे आवाहन उत्पादन शुल्क आयुक्तांनी केले आहे. 29 जूनपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.
निर्णय तूर्तास न राबवण्याचे ठरवले
दरम्यान, राज्यभरातील किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, आता राज्य शासनाकडून किराणा दुकानातून वाईनच्या विक्रीचा निर्णय तूर्तास न राबवण्याचे ठरवले आहे. नव्या नियमावलीच्या नियमाचा प्रारूप आधी प्रसिद्ध केले जाईल. त्यावर जनतेच्या प्रतिक्रीया आणि हरकती मागवल्या जातील. त्यानंतरच या संदर्भातील अंतिम निर्णय होणार आहे.
अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले आणि तरुण व्यसनाधीन होऊ शकतो. महिलांना त्रास होऊ शकतो, याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे, हेही आश्वचर्यकारक असल्याचे अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रातून म्हटले होते.