Maharashtra Breaking News LIVE Updates : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोनाबाधित
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Dr. Anil Awachat Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन
Dr. Anil Awachat Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं असून वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचलं.
अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं.
1969 साली त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झालं. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात त्यांनी केली. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत पूर्वायुष्यात आणण्याचं काम त्यांनी केलं. मुक्तांगण या संस्थेनं अनेक आयुष्य उध्वस्त होण्यापासून रोखली. अनिल अवचट हे एक डॉक्टर होतेच मात्र त्यांनी समाज परिवर्तनाचाही विडा उचलला होता. समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण करत त्यांनी अनेक कार्य केली.
Lavasa Verdict : 'लवासा'चं काय होणार? आज उच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता
Lavasa Verdict : पुणे जिल्ह्यात उभारलेल्या लवासा (Lavasa Project) हिल स्टेशनविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या नियमांचं उल्लंघन करून आणि विविध विभागांकडून बेकायदा परवानग्या घेऊन हा प्रकल्प उभारण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे तो रद्द करून लिलावाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली आहे. शरद पवार यांच्या निकटवर्तीयांचा हा प्रकल्प असल्यानं त्यांच्यावर मेहेरनजर करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या नियमांचे उल्लंघन करून तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांकडून बेकायदेशीर परवानग्या घेऊन उभारण्यात आलेला लवासा प्रकल्प बेकायदा ठरवत, तो रद्द करावा. तसेच त्याच्या लिलावाच्या प्रक्रियेला स्थगिती द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
दरम्यान, लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडून 2000 साली पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरणाच्या परिसरात तब्बल 25 हजार हेक्टर परिसरात लवासा प्रकल्प उभारण्यास सुरुवात करण्यात आली. लवासा प्रकल्प हा स्वातंत्र्यानंतरचं पहिलं हील स्टेशन असेल असा दावा त्यावेळी हा प्रकल्प उभारणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र सुरुवातीपासूनच हा प्रकल्प जमीन खरेदी असेल किंवा पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन असेल यामुळे वादामध्ये राहिला. 2010 साली तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी लवासा प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवत प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासूनच लवासा प्रकल्पाच्या आर्थिक अडचणींना सुरुवात झाली. काम बंद करण्याचे आदेश दिल्याने कंपनीचे शेअर्स शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कोसळले होते. त्यातूनच पुढे लवासाने आर्थिक दिवाळखोरीही जाहीर केली होती. त्यामुळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणि आर्थिक डबघाईला आलेला लवासा प्रकल्पाबाबत आज उच्च न्यायालय काय निर्णय देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
परभणीत मागील 24 तासांत 624 नवे कोरोनाबाधित
परभणी जिल्ह्यात मागील 24 तासांत 624 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 235 जणांना घरी सोडण्यात आलं आहे.
चंद्रपूरात 438 नवे कोरोनाबाधित
चंद्रपूर जिल्ह्यात 438 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. तर 563 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 3 हजार 876 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोना पाॅझिटीव्ह
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रीमंडळ बैठक सुरू असताना त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर, रिपोर्ट येताच मंत्रीमंडळ बैठकीतून ते तात्काळ बाहेर पडल्याचं समोर आलं असून चव्हाण आज सकाळीच काँग्रेस बैठकीला उपस्थित होते.
राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय
राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1000 हजार स्केअर फुटाच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विकता येणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात उभारावा, खा. राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा दिल्लीच्या महाराष्ट्र सदन येथील प्रांगणात उभारला जावा, अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं योगदान असून त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.