Maharashtra Breaking News 19 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...
रायगडमध्ये सापडलेल्या बोटीसंबंधी एटीएसची टीम तपास करणार
रायगडमध्ये सापडलेल्या बोट प्रकरणाचा तपास एटीएसची टीम करणार आहे. गुरुवारी सकाळी बोटीमध्ये एके-47 रायफल्स सापडल्यामुळे खळबळ माजली होती. त्यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल गुरुवारी सायंकाळी बोटीच्या ठिकाणी पोहचले होते. त्यांनी सर्व पाहणी केली. बोटीमध्ये मिळालेल्या साहित्याचीही त्यांनी पाहणी केली. तसेच पुढील तपासाची दिशा काय असेल याची चाचपणी केली.
आज राज्यभर दहीहंडीचा उत्साह
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा सण साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा राज्यभरात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये खासकरून मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे.
असा साजरा होणार दहीहंडीचा सण
टेंभीनाका दहीहंडी
ठाण्यातील टेंभीनाका या ठिकाणी आज दुपारी 12 वाजता दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे. तमन्ना भाटिया, श्रद्धा कपूर, आणि जॅकी श्रॉफ या बॉलिवूड कलाकारांच्या सोबत भार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, हार्दिक जोशी, स्मिता सरोदे, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, पूर्णिमा तळवलकर, चेतन वर्दने बॉईज 3 ची टीम, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, विदुला चौघुले हे कलाकार या कार्यक्रमाचे खास आकर्षण असतील.
दादर आयडीयल दहिहंडी
यंदा ही दहीहंडी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून सकाळी 9 ते 10 या दरम्यान आयोजित करण्यात येईल.
दादर शिवसेना भवनासमोर युवा सेनेकडून निष्ठा दहीहंडी
युवासेना कार्यकारिणीकडून दादरच्या शिवसेना भवनासमोर दहीहंडीचे आयोजन करण्यात आलं असून त्यातून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गीत-संगीत-भगव्याचा जल्लोष आणि मान्यवरांची उपस्थिती या दहीहंडी उत्सवाचं आकर्षण असेल.
ठाण्यात राजन विचारे यांची दहीहंडी
शिवसेना खासदार राजन विचारे यांनी ठाण्यामध्ये दहीहंडीचे आयोजन केलं आहे. त्यांच्या या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष लागलं असून या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
नागपुरात 20 वर्षीय तरुणीची गळा चिरून हत्या
नागपुरात 20 वर्षीय तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. काजल उमराव कुकडे (वय 20) असे हत्या झालेल्या तरूणीचे नाव आहे. आज सायंकाळच्या सुमारास काजल हिचा मृतदेह कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. तिची गळा चिरून हत्या केल्याचे पोलिसांना संशय आहे.
काजल ही नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालय सीताबर्डी येथे काम करत होती. ती आज सकाळी नेहमी प्रमाणे लता मंगेशकर रुग्णालयात गेली होती. दुपारी तिच्या आईने फोन केल्यावर दुपारी चार वाजे पर्यंत घरी येत असल्याचे सांगितले होते. मात्र, बराच वेळ ती घरी आली नसल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला. या दरम्यान कुटुंबियांना पोलिसांचा फोन आला व पोलिसांनी काजल मृत आढल्याची माहिती दिली.
कान्होबा मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम टँकची व्यवस्था
नागपूर. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगाने कान्होबा मूर्ती विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे शहरातील फुटाळा तलाव, शुक्रवारी तलाव, नाईक तलाव परिसरासह अन्य भागात विसर्जन टॅंकची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सर्व तलावांमध्ये मूर्ती विसर्जनास प्रतिबंध करण्यात आले आहे. मनपातर्फे नागरिकांना कृत्रिम विसर्जन टॅंकमध्ये मूर्ती विसर्जनाचे आवाहन करण्यात आले. मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनीही टँकमध्ये मूर्ती विसर्जन केले. शहरात विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेल्या कृत्रिम टँकची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी मनपाद्वारे shorturl.at/vwH17 ही लिंक जारी करण्यात आली आहे. आपल्या जवळचे कृत्रिम विसर्जन कुंड शोधण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
सिंचन घोटाळा प्रकरणात निवृत्त अधिकारी विजय पांढरे यांची एन्ट्री
सिंचन घोटाळा प्रकरणात निवृत्त अधिकारी विजय पांढरे यांची एन्ट्री झाली आहे. अजित पवार यांना खंडपीठाने क्लिन चिट दिलेली नाही, केवळ प्रतिज्ञापत्र सादर आहे. सिंचन घोटाळ्याची मागील दहा वर्षात काहीही चौकशी झाली नाही. सिंचन घोटाळाप्रकरणी फक्त कारवाईचे नाटक करण्यात आले, मात्र आरोपींवर अद्याप कारवाई नाही, असा आरोप सिंचन घोटाळा उघड करणारे जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केले आहेत.
नागपूर खंडपीठासमोर परमबीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली. मात्र खंडपीठाने ती अद्यापही मान्य केली नाही, असे पांढरे यांनी म्हटले आहे.
पालघरच्या धानिवरीमधील पुलावर खड्ड्यामुळे कंटेनर आणि कारचा अपघात
Palghar News : पालघर इथे मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. आज धानिवरी येथील पुलावर खड्ड्यामध्ये आदळून कंटेनर आणि कारचा पुन्हा अपघात घडला. या पुलावर धोकादायक खड्डे पडले असून सातत्याने खड्ड्यांमध्ये वाहन आढळून टायर फुटण्याचे प्रमाण वाढलं असून सतत अपघात घडत आहेत. मात्र महामार्ग प्रशासन या बाबीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
Maharashtra : कोकणात आता दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा जाहीर कार्यक्रम
Maharashtra : कोकणात आता दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा जाहीर कार्यक्रम शुक्रवारी गोपाळकाल्याचे औचित्य साधत रंगणार आहे. यावर्षी लाखो रुपयांच्या बक्षीसांची चढाओढ जिल्ह्यात चर्चेत राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात रंगताना पहायला मिळणार आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदासभाई कदम यांचे सुपूत्र आमदार योगेश कदम यांचा हा दापोली हा विधानसभा मतदारसंघ आहे. शिवसेनेच्या कदम गटाची दहीहंडी असते तशी यंदाही आहे पण यंदा प्रथमच ठाकरे गटाबरोबर असलेल्या सूर्यकांत दळवींनीही टस्सल देण्यासाठी दहीहंडी उत्सवात दरवर्षी एक लाख असलेले बक्षीस तीन लाख एकावन्न हजार ठेवले आहे.