Maharashtra Breaking News 17 August 2022 : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...
शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन
राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदार सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. . गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून घमासान पाहयला मिळणार आहे.
सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन
राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन होणार असून नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
अमूल आणि मदर डेअरीचं दूध महागलं, दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ
भल्या पहाटे दुधाच्या खरेदीनं दिवसाची सुरुवात करण्याऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आता आणखी वाढ होणार आहे. अमूल आणि मदर डेअरीचं दूध महागलं असून, या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दुधाचे हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
भारतीय फुटबॉल असोसिएशनची मान्यता निलंबित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
जागतिक फुटबॉल संघटना म्हणजेच फीफानं भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाच्या कारवाईप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारतीय फुटबॉल महासंघात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप वाढला असल्यानं तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचं फिफानं स्पष्ट केलंय. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज मुद्दा न्यायालयात मांडला. फीफानं केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळं ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंडर-17 महिला विश्वचषक अडचणीत आला आहे
Vinayak Mete Accident : विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशीचे मुख्यमंत्र्याचे आदेश
Vinayak Mete Accident : विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत.
बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, भाजपची इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
Sangli News : इस्लामपूर येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती. यावर इस्लामपूर मधील भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार भाजपाच्या नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात दिली आहे. एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी चालवलं, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
























