Maharashtra Breaking News LIVE Updates : पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Mar 2022 06:23 PM
Kokan Rain : तळकोकणात अवकाळी पावसासह गारपीट

तळकोकणात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. आंबोली, कणकवली फोंडा परीसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस होत असून मागील जवळपास अर्धातास गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकाला फटका बसला आहे.

Beed News : सह्याद्री देवराई प्रकल्पाजवळील पालवन डोंगराला आग

Beed News : काही दिवसांपूर्वी बीडच्या सह्याद्री देवराई प्रकल्पामध्ये आग लागून मोठे नुकसान झाले होते. आता सह्याद्री देवराईच्या प्रकल्पाला लागून असलेल्या पालवनच्या डोंगराला आज दुपारी आग लागली होती. या आगीमध्ये साधारण तीन एकर परिसरातील झाडे जळाली आहेत. सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या बाजूला फॉरेस्टची जागा डोंगरावर आहे तिथे वेगळ्या प्रकारचे झाड यापूर्वी लावली आहेत.  

Palghar Rain : पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी

Palghar Rain :  पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा फळ उत्पादकांसह भाजीपाला उत्पादक संकटात सापडला आहे तर दुसरीकडे सातत्याने होत असलेल्या अवकाळी मुळे वीट भट्टी वीट भट्टी उत्पादकही संकटात आला आहे

हा राजकिय संघर्ष नाही तर देशभक्तांचा संघर्ष - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक. भाजपचे प्रमुख नेते आझाद मैदानावर उपस्थित. हा संघर्ष देशभक्तांचा आहे. हा संघर्ष भारतमातेसाठी आहे. हे मावळे झुकणार नाही.
नवाब मलिकचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

12 बाॅम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद होता. - आशिष शेलार

 आज नवाब मलिकांच्या राजीनाम्या संदर्भात मुंबईत भाजपाचा मोर्चा सुरु असून आशिष शेलार यावेळी म्हणाले...  
- 93 चा बाॅम्बस्फोट अजूनही आम्ही विसरलो नाही. या बॉम्बस्फोटात 84 लोकं एकाच वेळी मारली गेली. दीडची वेळ आहे अशाच दीडची वेळ होती आणि स्टाॅक एक्सचेंजजवळ स्फोट झाला. शिवसेना भवन, माहिम, सेंच्युरी बाजार, झवेरी बाजार, वांद्रे, प्लाजा, जुहू सेंटर, साहार एअरपोर्टवर बाॅम्बस्फोट झाला. 12 बाॅम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद होता. 

Nitesh Rane : पवार आणि मुख्यमंत्र्यांना संदेश गेला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राचं वाकडं करु शकत नाही : नितेश राणे

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्या

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्या. गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी जनहित याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणात जनहित याचिका दाखलच होऊ शकत नाही, असं सांगत याचिकाकर्त्यांनी नियमांचं अयोग्य वाचन केल्याचं हायकोर्टाने नमूद केलं. गिरीश महाजन यांनी भरलेले 10 लाख तर व्यास यांनी भरलेली 2 लाखांची अनामत रक्कम कोर्टाने जप्त केली आहे.

मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील वादातून सर्वसामान्य जनतेचं नुकसान : हायकोर्ट

राज्याचं दुर्दैव आहे की, मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही दोन प्रमुख घटनात्मक पद एकमेकांच्या सोबत नाही. पण या वादातून नुकसान मात्र सर्वसामान्य जनतेचं होतं, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली. तसंच विधानपरिषदेवरील 12 नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीवरुन राज्यपालांनी हायकोर्टाच्या आदेशांचा मान राखायला हवा होता, असं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी म्हटलं.


दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या आवाजी निवडीवरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. परंतु गिरीशी महाजन यांच्या याचिकेत आम्हाला वैधता दिसत नाही. या निवडीवरुन सर्वसामान्य जनतेचं काय नुकसान होतंय?, असा सवाल हायकोर्टाने विचारला. गिरीश महाजन यांच्यावतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी केलेल्या युक्तिवादावर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली.

यवतमाळमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात माय-लेकीचा मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील आयता गावात सकाळी साडेआठच्या सुमारास विनोद जयस्वाल यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये माय-लेकीचा मृत्यू झाला. काजल विनोद जयस्वाल (वय 30 वर्षे), वैभवलक्ष्मी विनोद जयस्वाल (वय 5 वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. या  स्फोटामध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं. नागरिकांनी तातडीने याची माहिती घाटंजी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण घटनास्थळी दाखल झाले.

स्फोटामुळे घराजवळच्या इतर दोन ते तीन घरांचंही किरकोळ नुकसान झालं. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

सेन्सेक्समध्ये 529 अंकांची उसळी तर निफ्टी 151 अंकांनी वधारला





मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 529 अंकांची उसळी, तर निफ्टी देखील 151 अंकांनी वधारला. ऑईल ॲंड गॅस, रिॲलिटी, फाॅर्मा आणि आयटी क्षेत्रातील समभागात चांगली तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय विमाने सुरळीत सुरु होणार असल्याने एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये वृद्धी झाली आहे. मात्र तेलाच्या किंमती वाढत्या असल्याने अस्थिरता कायम आहे. काल डाॅलरच्या तुलनेत रुपया 76.91 वर बंद झाल्यानंतर आज व्यवहार सुरु होताच रुपया 9 पैशांनी सावरला. डाॅलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 76.82 वर आली आहे


 

 



 


Rahul Kanal IT Raid : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांची आयकर विभागाकडून तब्बल 15 तास चौकशी

Rahul Kanal IT Raid : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तसंच शिर्डी संस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांची आयकर विभागाकडून तब्बल 15 तास चौकशी करण्यात आली. रात्री साडेबारा वाजता आयकर विभागाचे पथक कनाल यांच्या घरातून बाहेर पडलं. आयकर विभागाने कनाल यांच्या घरातून काही कागदपत्रं जप्त केल्याची माहिती मिळतेय. शिवाय दुपारी आयकरचे अधिकारी राहुल कनाल यांच्या वडिलांना घेऊन गेले होते. चौकशीनंतर राहुल यांच्या वडिलांना घरी आणण्यात आलं. धाड नेमकी कोणत्या प्रकरणी पडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अजिंक्यतारा कारखान्याकडून दहाव्या दिवसाला ऊसाचे पेमेंट, याला भ्रष्टाचार म्हणायचा? : शिवेंद्रराजे

सातारा : "उदयनराजे जर छत्रपतींच्या विचाराला धरुन काम करतात तर ते लोकसभेला पराभूत का झाले आणि त्याच विधानसभेच्या निवडणुकीत मी का निवडून आलो, याचे उत्तर त्यांनी द्यावे," असे म्हणत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसंच यांचा छत्रपतींचा विचार म्हणजे गाडी उडवून खेळ करणे, गाडीमध्ये म्युझिकचा मोठा आवाज करुन चौकाचौकात रात्रीचे फिरायचे, अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Weather News : महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Weather News : दिल्लीसह उत्तर भारतात हवामानात बदल होत आहे. उत्तर भारतातील काही भाग सोडला तर अन्य भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरसह राजस्थानमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच दुसरीकडे, आज महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. 


हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरामतमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Russia Ukraine : अमेरिकेकडून रशियावर इंधन आयात निर्बंध

Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने रशियाची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेने आधीच निर्बंध लावले लागू होते. त्यात आता मंगळवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या गॅस, कच्च्या तेलाच्या आयातींवर बंदी घालण्याची घोषणा केली. या निर्बंधामुळे रशियाला मोठा आर्थिक झटका बसेल असे म्हटले. मात्र, बायडन यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावर काय परिणाम होतील, याची चर्चा सुरू झाली आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Russia Ukraine : अमेरिकेकडून रशियावर इंधन आयात निर्बंध; जगभरात उडणार महागाईचा भडका?


Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने रशियाची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेने आधीच निर्बंध लावले लागू होते. त्यात आता मंगळवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या गॅस, कच्च्या तेलाच्या आयातींवर बंदी घालण्याची घोषणा केली. या निर्बंधामुळे रशियाला मोठा आर्थिक झटका बसेल असे म्हटले. मात्र, बायडन यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावर काय परिणाम होतील, याची चर्चा सुरू झाली आहे. 


कच्च्या तेलाचे दर वाढणार?


अमेरिकेकडून रशियाच्या तेल आयातीवर बंदी घातल्याचा परिणाम दरांवर होण्याची भीती आहे. रशिया हा जगभरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशापैकी एक आहे. जगभरात दररोज कच्च्या तेलाच्या 10 बॅरलचा पुरवठा होत असेल तर,  त्यापैकी एक बॅरल रशियातील आहे. रशियाच्या उपपंतप्रधानांनी कच्च्या तेलाचे दर 300 डॉलर प्रति बॅरल इतकी होण्याचा अंदाज वर्तवला होता. 


Petrol-Diesel Price : काल दरवाढ टळली, आजचं काय? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधन दर


Petrol-Diesel Price Today 9 March 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी (oil companies) पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) आजचे दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती बदललेल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वी सर्व पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींच्या सर्व टप्प्यातील मतदान संपलं. त्यामुळे आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र नागपुरात सीएनजीच्या (CNG) किमतीत मात्र मोठी वाढ झाली आहे. 


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ (Petrol-Diesel Price) होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे ( 5 State assembly election) दरात वाढ झाली नसल्याचं मानलं जात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.