Maharashtra Breaking News 09 June 2022 : वलसाड येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या एसटी बसला आग, जीवितहानी नाही
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
कुतुबमिनार परिसरात हिंदूना पुजेचा अधिकार मिळणार? आज कोर्ट सुनावणार निकाल
कुतुबमिनारच्या परिसरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्लीच्या साकेत कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते बायोटेक स्टार्टअप एक्सपो 2022 उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बायोटेक स्टार्टअप एक्सपो 2022 उद्घाटन करण्यात येणार आहे. बायोटेक स्टार्टअप एक्सपो 2022 चे राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद जम्मू दौऱ्यावर
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज जम्मू दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती या दरम्यान आयआयएमच्या पदवी प्रदान सोहळ्याला देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच वैष्णवी मातेच्या दर्शनासाठी देखील जाणार आहेत.
सत्येंद्र जैन यांना न्यायालयासमोर हजर करणार
दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांना ईडीने 9 जूनपर्यंत कोठडी दिली होती. आज कोठडी संपत असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करणार आहे.
देशमुख आणि मलिकांना मतदानाची परवानगी मिळणार का? आज निर्णय येणार
शुक्रवारी राज्यसभेकरता मतदानाला हजेरी लावण्याची परवानगी मागत कोर्टात अर्ज केलाय. दोघांच्या अर्जाला ईडीचा जोरदार विरोध. कैद्यांना मतदानाचा अधिकारच नाही, असा दावा ईडीनं कोर्टात केलाय. काल दिवसभराच्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीश राहुल रोकडे गुरूवारी पहिल्या सत्रात निकाल जाहीर करणार
मुंबई वाहतूक पोलिसांची मोहीम आजपासून सुरु होणार
मुंबईत जर तुम्ही फिरण्यासाठी मोटारसायकलवर मागे बसण्याचा विचार करत असाल, मग हेल्मेट घाला नाहीतर मुंबई वाहतूक पोलीस तुम्हाला दंड करायला तयार आहेत. मुंबईत मोटारसायकलवर हेल्मेटशिवाय बसणाऱ्यांवर आजपासून कारवाई करणार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी- 20 सामना
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पहिला टी20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारताचं कर्णधारपद केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे ऋषभ पंतकडे गेलं आहे. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे. तर या सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.
वलसाड येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या एसटी बसला आग, जीवितहानी नाही
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या एसटी बसला भीषण आग लागली आहे. बसचे टायर गरम होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वलसाड जिल्ह्यातील कुंडी गावाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, वीज पडून महिलेचा मृ्त्यू
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. चांदवड तालुक्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आहे. ईगतपुरी, देवळा, निफाड, सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.
या पावसात मौजे संसारी येथील सविता बाळासाहेब गोडसे (वय 40) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच चांदवड परिसरात माजी आमदार शिरीष कोतवाल हे अचानक पाऊस सुरू झाल्याने कांदा शेडमध्ये थांबले असताना वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या अंगावर शेड पडले. त्यात ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Presidential Election 2022 : समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज: शरद पवार
समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. दिवस कमी आहेत, त्यामुळे जास्त वेळ घालवण्यात आलं आहे असं शरद पवार म्हणाले. अर्जुनाचा लक्ष्य जसे माशाच्या डोळ्यावर तसं आमचं लक्ष 18 तारखेवर असल्याचं ते म्हणाले. तर सोनिया गांधींच्या आदेशानंतर आपण शरद पवारांच्या भेटीला आल्याचं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.
Mumbai Local : ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्ग ठप्प
Mumbai Local : वाशी आणि सानपाडा स्टेशन दरम्यान ओव्हर हेड वायर तुटली आहे. 7.15 पासून ठाणे - वाशी मार्ग बंद आहे. मात्र ठाणे पनवेल, ठाणे नेरूळ, मार्ग सुरू आहे. प्रवाशांना वाशीला जायचे आहे त्यांना जुई नगरला उतरून जावे लागणार आहे.
संपूर्ण महाबळेश्वर अंधारात, चार तासापासून वीज गायब
मान्सूनपूर्व पावसात संपूर्ण महाबळेश्वर अंधारात गेले आहे. गेल्या चार तासापासून वीज गायब आहे. महाबळेश्वरमध्ये पहिल्याच पावसात महामंडळाची परीक्षा घेतली आहे.