Loksabha Election 2024: 98 वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या राज्यातील पहिल्या गृह मतदार; निवडणूक आयोगाचा पहिल्यांदाच उपक्रम
Maharashtra Loksabha Election 2024: निवडणूक आयोगानं यावर्षी पहिल्यांदा गृह मतदानाची सोय केली आहे. अशातच भंडाऱ्याच्या 98 वर्षीय जैनबी जब्बर कुरेशी या राज्यातील पहिल्या गृह मतदार ठरल्या आहेत.
Loksabha Election 2024 : दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक जे मतदान केंद्रापर्यंत मतदानासाठी जाण्यास असमर्थ आहेत, अशांसाठी निवडणूक आयोगानं (Election Commission) यावर्षी गृह मतदानाची सोय केली आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील 98 वर्षीय जैनबी जब्बर कुरेशी या जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिल्या गृह मतदार ठरल्या आहेत. मागील पाच वर्षात प्रकृती बरी राहत नसल्यानं त्यांनी मतदान केलं नव्हतं. मात्र, यावर्षी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान अधिकारी त्यांच्या घरी पोहचलेत आणि त्यांचं मतदान करून घेतलं. राज्यातील लोकसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात होत आहे. त्याअनुषंगानं भंडाऱ्यात झालेल्या गृह मतदान प्रक्रियेत जैनबी कुरेशी यांचं मतदान झालंय.
95 वर्षीय आजीने केले लोकशाही बळकट करण्याचे काम
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला आहे. याच अनुषंगाने आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी 95 वर्षीय गंगादेवी शंकरलाल कान्हु यांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे काम केले आहे. निवडणूक आयोगामार्फत 85 वर्षे वरील व्यक्तींना तसेच अपंग व्यक्तींना घरपोच मतदानाचा अधिकार बजावण्याचा हक्क दिलाय. अशातच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुसद शहरातील गंगादेवी शंकरलाल कान्हु या 95 वर्षीय वयोवृद्ध आजीने मतदान केंद्रावर न जाता घरीच आपला आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी गंगादेवी कान्हु यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसून आले.
मतदारांसाठी 107 किलोमीटरचा प्रवास
कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणुक -2024 साठीही आपलं मतदान केलंय. त्यांच्या सोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा या 86 वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान चमूने अहेरी ते सिरोंचा हे तब्बल 107 किलोमीटरचे अंतर गाठले आणि गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांचे मतदान नोंदविले. दोघेही वयोवृद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी गृहमतदानाची निवड करून आपले मत घरातच स्थापन केलेल्या तात्पुरत्या मतदान कक्षात गोपनियता बाळगून नोंदविले.
इतर महत्वाच्या बातम्या