Lockdown Big Breaking | राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्यात लसीकरण वेगाने वाढवलं जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावं लागेल. जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की लसीकरण करुन घ्या. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्क वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस
उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाची लस घेतली. लस घेतल्यानंतर बोलताना त्यांनी म्हटलं की, लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. मी स्वत: लस घेतली आहे आता जनतेनेही घ्यावी, असं मी सर्वांना आवाहन करतो. उद्धव ठाकरे यांनी भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतली आहे.
नागपूर शहरात 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे.
काय सुरु राहणार?
नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत हे लॉकडाऊन लावले जाणार आहे. 15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी असणार आहे. नागपूर पोलिसांना कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं. या काळात उद्योग सुरू राहतील. सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील. भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया या सेवा देखील सुरु राहतील.
काय बंद राहणार?
लॉकडाऊन केलेल्या क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत. दारूची दुकाने बंद राहतील. मात्र दारूची ऑनलाईल घरपोच सेवा सुरू राहणार आहे.