(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jaidatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागरांचा शेवटच्या क्षणी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा, राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंना धक्का
Jaidatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) यांनी मराठवाडा शिक्षक संघ निवडणुकीत (Marathwada Teacher Constituency Election) अखेर भाजपच्या (BJP) उमेदवारालाच पाठिंबा दिला आहे.
Jaidatta Kshirsagar : शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले ओबीसीचे नेते जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) यांनी मराठवाडा शिक्षक संघ निवडणुकीत (Marathwada Teacher Constituency Election) अखेर भाजपच्या (BJP) उमेदवारालाच पाठिंबा दिला आहे. यावरुन जयदत्त क्षीरसागर यांची भाजप सोबतची जवळीकता वाढत असल्याचं दिसत आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपने किरण पाटील (Kiran Patil) यांना उमेदवारी दिली आहे. आता जयदत्त क्षीरसागर यांनी शेवटच्या क्षणी किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानं हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळेंना (Vikram Kale) मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी उमेदवार विक्रम काळेंना धक्का
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात माजी मंत्री आणि शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले नेते जयदत्त क्षिरसागर हे नेमकी काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होते. मात्र, अखेर शेवटचा क्षणी क्षीरसागरांनी आपला पाठीबा भाजप उमेदवार किरण पाटील यांना दिला आहे. अधिकृत दिल्याचे जाहिर केल्याने राष्ट्रवादी उमेदवार विक्रम काळेंना हा फार मोठा धक्का बसणार. दरम्यान भाजपा निवडणुक प्रभारी राणाजगजितसिंह पाटील यांनी बीडमध्ये येऊन क्षीरसागरांच्या नवगण महाविद्यालयात समर्थक, संस्था चालकांसोबत बैठक घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर उपस्थीत होते.
उद्या होणार मतदान
पदवीधर (Graduates ) आणि शिक्षक ( Teachers) मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी काल दिवसभर सभा, मेळावे आणि गाटीभेटींवर भर दिला. या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (30 जानेवारी 2023) मतदान होणार आहे.
कुठे कोण आमने-सामने?
राज्यातील पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे. तर या पाच जागांवर सध्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील अशी लढत होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सध्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे डॉ. रणजित पाटील आणि काँग्रेसकडून धीरज लिंगाडे हे आमनेसामने आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे , भाजपकडून किरण पाटील हे दोघे महत्वाचे उमेदवार आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक भारतीचे धनाजी पाटील, शेकाप व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार बाळाराम पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. तर नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.