Maharashtra Rain | पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस, शेतकरी हवालदिल, कोकणात आंब्याचं मोठं नुकसान
Maharashtra Rain : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये रविवारी रात्री आणि सोमवारी जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. आज पुणे, सोलापूरसह कोकणातील काही भागात जोरदार पावसाने वादळासह हजेरी लावली.
Maharashtra Rain : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये रविवारी रात्री आणि सोमवारी जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारपासूनच सिंधुदुर्गसह राज्यातील तुरळक भागांत पावसानं हजेरी लावली होती. ज्यानंतर मराठवाडा, विदर्भाकडेही पावसानं आपला मोर्चा वळवल्याचं दिसून आलं. आज पुणे, सोलापूरच्या काही भागात जोरदार पावसाने वादळासह हजेरी लावली.
पुण्यात दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळं काही भागातील बत्ती गुल झाली. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. यामुळं शेतातील ज्वारीसह अन्य पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दोडामार्ग शहर, भेडशी, पिकुळे, उसप तसेच दोडामार्ग तालुक्यात बहुतेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. कोकण किनारपट्टी भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे कोकणात काही भागात मेघगर्जना, वादळी वारा, विजांसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात काहीशी घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
चिपळूण तालुक्यातील शिरगाव व सह्याद्री खोऱ्यातील परिसरात काल आणि आज सायंकाळी 5 वाजता मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकरी,व्यापारी आणि ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवर झाडे पडली असून लाखोंचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसला आहे.
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट
हवामान खात्याने अवकाळी पावसाच्या इशाऱ्यानंतर वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी गारपीटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक झाडे उन्मळून पडली तर विजेच्या ताराही तुटून पडल्या. तर शेतकऱ्यांचं रब्बी पिकांसह फळबागा आणि कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिजवाई कांदा उत्पादन घेतला जातो. यासह आंबा पिकांसह चिकू, केळी,टरबूज, खरबूज आणि तुरळक प्रमाणात रब्बी पिक गहू आणि हरभरा यांचं नुकसान झालंय. दीडशे एकरवरील कांदा तर 200 एकर पेक्षा अधिक क्षेत्रावरील हाताशी आलेलं आंबा पिक हातचं गेल्याने लवकर नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.