HMPV चा पहिला रुग्ण आढळला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर, आरोग्यमंत्री आबिटकरांनी बोलावली महत्त्वाची बैठक!
HMPV Virus Maharashtra: भारतात HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे.
HMPV Virus Maharashtra: चीनमधील HMPV व्हायरसमुळे (HMPV Virus) महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. स्वच्छतेची नियमावली पाळण्याच्याही सूचना महाराष्ट्र सरकारने दिल्या आहेत. तसेच आयोग्य विभागाने नियमावली जाहीर केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.
भारतात HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आरोग्य विभागाने गाईड लाईन जारी केल्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर महत्त्वाची बैठक घेणार आहेत. प्रकाश आबिटकर गुरुवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीत HMPV विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा होणार आहे. सर्वसामान्यांमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे याबाबत चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रकाश आबिटकर काय म्हणाले?
भारतात आलेल्या नवीन व्हायरस बद्दल सरकार गांभीर्याने आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. येत्या दोन दिवसात आरोग्य विभागाची बैठक मुंबईत घेतली जाईल. बैठकीनंतर या रोगाबद्दल घेण्यात येणाऱ्या काळजी बद्दलचे निर्देश जाहीर केले जातील. राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याशी देखील याबाबत चर्चा करू...राज्य सरकार ज्या सूचना करतो त्याचे पालन नागरिकांनी काटेकोरपणे करावं, असं आवाहन प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही-
महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कोरोना आजारासारखी दिसतात लक्षणे-
एचएमपीव्हीच्या संसर्गात सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणे दिसतात. खोकला, ताप येतो, सर्दी होते. ह्यूमन मेटाप्रोन्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा मेटाप्रोन्युमोव्हायरस जीन्सचा आरएनए विषाणू आहे. त्याच्या बाधेमुळे लहान मुले आणि वृद्ध यांना सर्वांत जास्त त्रास होतो. या आजारांमुळे चिनी अधिकाऱ्यांनी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास, मास्क घालण्यास व हात सॅनिटाईझ करण्यास सांगितले आहे. एचएमपीव्ही विषाणूमुळे झालेला संसर्ग बरा करण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही.
सावधान, HMPV व्हायरसपासून वाचण्यासाठी हे करा :
- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
हे करू नये :
- हस्तांदोलन
- टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
- आजारी लोकांशी जवळचा संपर्क
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे
संबंधित बातमी:
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?