Maharashtra Corona Vaccination : लसीकरणात महाराष्ट्राने दोन कोटींचा टप्पा ओलांडला!
लसीकरणात महाराष्ट्राने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रात एकूण 2 कोटी 90 हजार 308 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांचं लसीकरण करणारं महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण अभियान सुरु झाल्यापासून आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 17 मे 2021 पर्यंत एकूण 2 कोटी 90 हजार 308 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. तर 17 मे 2021 रोजी राज्यात एकूण 1239 लसीकरण सत्रे आयोजित करुन एकूण 99, 699 लाभार्थ्यांचं लसीकरण केलं.
एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांचं लसीकरण करणारं महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरलं आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.
लसीच्या तुटवड्याचा दाखला देत राज्य सरकारने 18-44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरणं थांबवलं. या वयोगटासाठीच्या लस 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरणार असल्याचं सांगितलं. राज्यात आतापर्यंत 23 लाख 23 हजार 322 लाभार्थ्यांना फ्रण्ट लाईन वर्कर्सना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. तर 18 लाख 50 हजार 773 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला आणि दुसरा डोस दिला आहे. याशिवाय 18 ते 44 वर्षे वयोगटातील 6 लाख 55 हजार 685 लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 45 वर्षांवरील वयोगटातील 1 कोटी 52 लाख 60 हजार 528 नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.
Maharashtra has crossed 2 crore mark in #COVID19 vaccination on May 17 as 20090308 were vaccinated so far
— Sanjay Jog (@SanjayJog7) May 18, 2021
On May 17 a total of 99699 were vaccinated in 1239 sessions
.@fpjindia pic.twitter.com/Wk6jJpZoBJ
- फ्रण्ट लाईन वर्कर्स (पहिला आणि दुसरा डोस)
23 लाख 23 हजार 322
- आरोग्य कर्मचारी (पहिला आणि दुसरा डोस)
18 लाख 50 हजार 773
- 18 ते 44 वर्षे वयोगट (पहिला डोस)
6 लाख 55 हजार 685
- 45 वर्षांवरील वयोगट (पहिला आणि दुसरा डोस)
1 कोटी 52 लाख 60 हजार 528
मुंबईत सर्वाधिक लसीकरण
आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण मुंबईत झालं आहे. मुंबईत आतापर्यंत 28 लाख 92 हजार 457 नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात 26 लाख 17 हजार 053 जणांनी लस घेतली आहे. याशिवाय ठाण्यात 15 लाख 28 हजार 734, नागपूर 12 लाख 20 हजार 752 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 11 लाख 39 हजार 682 जणांंनी कोरोनाची लस घेतली आहे.
राज्यात सोमवारी (17 मे) नवीन कोरोबाधितांच्या संख्येत घट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच दिवसांनंतर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. काल (17 मे) तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान काल 516 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.