अखेर महाराष्ट्र गुजरात सीमा निश्चितीला प्रारंभ,दोन दिवस होणार मोजणी
Maharashtra News : गुजरात प्रशासनाने बंद केलेला भाग महाराष्ट्राच्या हद्दीतला असून मागील काही वर्षात वेवजी गावच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची चर्चा सुरु झाली.

पालघर : महाराष्ट्र गुजरात सीमा निश्चिती नसल्याने लगतच्या गुजरात राज्याने तलासरी तालुक्यातील वेवजी गावातल्या जमिनीवर घुसखोरी केली. याबाबत स्थानिक नागरिकांनी हद्द निश्चितीसाठी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून गुरुवार, 3 मार्च रोजी दुपारी प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वेवजी-सोलसुंभा सीमा निश्चितीला सुरुवात झाली. मात्र गुजरात शासनाकडून कोणीही उपस्थित राहिले नाही. सीमा निश्चितीला सुरुवात झाल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायत आहे. या गावालगत गुजरात राज्याच्या बलसाड जिल्ह्यातल्या उंबरगाव तालुक्यातील सोलसुंभा ग्रामपंचायत आहे. कोव्हिड काळात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर गुजरात प्रशासनाने सीमा भागातील रस्ते लोखंडी पत्रे लावून बंद केले. त्यापैकी एप्रिल 2020 ला उंबरगाव रेल्वे स्थानकाहून तलासरीकडे जाणारा जिल्हा मार्ग वेवजी येथे बंद केल्याने बोर्डी तसेच तलासरीकडे जाण्यासाठी गैरसोय निर्माण झाली. वेवजी हे आदिवासी बहुल सीमा भागातील गाव असून उंबरगाव बाजारपेठेतून जीवनावश्यक वस्तूंसाठी अवलंबून राहावे लागते. ही रसद बंद झाल्याने स्थानकांनी संताप व्यक्त केला. गुजरात प्रशासनाने बंद केलेला भाग महाराष्ट्राच्या हद्दीतला असून मागील काही वर्षात वेवजी गावच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची चर्चा सुरु झाली.
त्यानंतर ग्रामस्थ अशोक रमण धोडी यांनी गावचा नकाशा, फेरफार उतारे इ. कागदपत्रांची महाराष्ट्र तसेच गुजरातच्या प्रशासनाकडून जमवाजमव केली. त्यानंतर वेवजी ग्रामपंचायत, तलासरी तहसीलदार आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे गुजरात राज्याने वेवजी गावातील भूखंड हडपल्याची तक्रार केली. त्यामुळे सीमा वादाचा प्रश्न जिव्हाळ्याचा बनला. वेवजी ग्रामपंचायतीनेही महसूल आणि भू अभिलेख विभागाकडून माहिती घेत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. सीमा निश्चितीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासनानेही ही बाब गांभीर्याने घेतली. अखेर 3 व 4 मार्च रोजी सीमा निश्चितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भू अभिलेख, सार्वजनिक बांधकाम महसूल विभाग, वेवजी ग्रामपंचायतिला आदेश दिले. गुरुवार, 3 मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास हद्द निश्चीतीच्या कामाला सुरुवात झाली. राज्याच्या हक्काची जमीन मिळून सीमा वाद संपणार असल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :

























