Air India ची इमारत खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची नवी ऑफर! आज मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक, हालचालींना वेग
Air India : एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Air India : एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) नवी ऑफर दिल्याचे समजते, एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या इमारतीत होणार मंत्रालयाचा विस्तार?
महाराष्ट्र सरकारला 1600 कोटींची ही इमारत खरेदी करायची आहे. यापूर्वी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात, महाराष्ट्र सरकारने केंद्राला 1400 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र, केंद्राने एअर इंडियाची इमारत 2000 कोटींना विकण्याची ऑफर दिली. सुत्रांच्या माहितीनुसार, 2018 मध्ये फडणवीस सरकार एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यास इच्छुक होते. याचे कारण महाराष्ट्राच्या प्रशासनाचे सर्व विभाग एकाच इमारतीत आणण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. सर्व कार्यालयं या एकाच इमारतीत हलवली, तर कारभारात अधिक पारदर्शकता येईल, तसेच कारभार अधिक गतिमान होईल असे राज्य सरकारला वाटते. एअर इंडिया कंपनी टाटा समूहाला विक्री केल्यानंतर मुंबईतील एअर इंडियाची बिल्डिंग केंद्राच्या अख्यत्यारित आली आहे. ही बिल्डिंग राज्य सरकारला हस्तांतरित करावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती. ही बिल्डिंग जर राज्य सरकारला मिळाली तर त्या ठिकाणी मंत्रालयाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
एअर इंडिया बिल्डिंगची वैशिष्ट्य काय? कसा केला जाणार मंत्रालयाचा विस्तार?
-मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात 1974 साली नरिमन पॉईंट या समुद्र किनारी असलेल्या प्राइम लोकेशनवर या इमारतीचा काम पूर्ण झालं. एकूण 10,800 स्केअर फूटमध्ये ही 23 मजल्याची एअर इंडियाची ही टोलेजंग इमारत मुंबईकरांसाठी एक वेगळंच आकर्षण आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटात या एअर इंडिया बिल्डिंगला लक्ष करत बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला होता.
-एअर इंडियाचे मुख्यालय 2013 साली दिल्लीत हलवण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील एअर इंडियाच्या बिल्डिंगमधील 23 मजल्यांपैकी 17 मजले एअर इंडियाने भाडेतत्त्वावर दिले होते. एअर इंडियाने हे बिल्डिंग विक्रीसाठी काढल्यानंतर 2019 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने ही बिल्डिंग खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
-मे 2019 मध्ये एअर इंडियाच्या इमारतीसाठी राज्य सरकारने तब्बल 1400 कोटी रुपयांची बोली लावली होती. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) अनुक्रमे 1375 कोटी आणि 1200 कोटी रूपयांची बोली लावली होती. मात्र त्यानंतर यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने हे काम बारगळलं.
-शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर एअर इंडियाची बिल्डिंग खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. राज्य सरकारने पुन्हा एकदा ही बिल्डिंग खरेदी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन एअर इंडियाची बिल्डिंग राज्य सरकारला मिळावी या संदर्भात चर्चा केली.
-राज्य सरकार सोबत रिझर्व बँक सुद्धा एअर इंडियाची बिल्डिंग खरेदी करण्यास इच्छुक आहे. एअर इंडियाची बिल्डिंग राज्य सरकारने घेतल्यास मंत्रालयाचा विस्तार या बिल्डिंगमध्ये केला जाणार आहे. सध्या मंत्रालय आणि अॅनेक्स बिल्डिंगमध्ये विविध विभागाची शासकीय कार्यालयं आहेत. मात्र या सर्व शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडत आहे.
-एअर इंडियाची बिल्डिंग राज्य सरकारला मिळाल्यास मंत्रालयातील विविध विभागाच्या शासकीय कार्यालयांचा विस्तार या एअर इंडियाच्या बिल्डिंगमध्ये केला जाईल, जेणेकरून विविध विभागाची शासकीय कामे जलद गतीने होतील. शिवाय मंत्रालयातील रोजची होणारी गर्दीसुद्धा विभागली जाऊन नियंत्रणात येईल.
इतर महत्वाच्या बातम्या
Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार