राज ठाकरेंविरोधात द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबाबत तिळमात्र सहानुभूती नाही, मनसेची भूमिका
Maharashtra Government Formation : उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हा मनसे महाराष्ट्र सैनिकांना तिळमात्रही सहानुभूती नाही, अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
Maharashtra Government Formation : राज्यातील सत्तासंघर्षाला (Maharashtra Political Crisis) नवं वळण लागलं आहे. काल (गुरुवारी) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं. त्यामुळे राज्यात आता भाजपचं सरकार येणार हे निश्चित झालं. एकनाथ शिंदे आणि काही आमदारांच्या गटानं केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आणि अखेर ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागला. उद्धव ठाकरेंनी काल जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला आणि मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचं जाहीर केलं. एवढंच नाहीतर त्यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हा मनसे महाराष्ट्र सैनिकांना तिळमात्रही सहानुभूती नाही, अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. राज ठाकरेंच्या विरोधात नेहमीच द्वेषाचं राजकारण करणाऱ्या आणि प्रत्येक बाबतीत राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला अजिबातच सहानुभूती नाही, अशी भूमिका मनसेनं घेतली आहे.
मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, "राज साहेबांच्या विरोधात नेहमीच द्वेषाचं राजकारण करणार्या, प्रत्येक बाबतीत राज ठाकरेंचं नुकसान करणारे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हा मनसे महाराष्ट्र सैनिकांना तिळमात्रही सहानुभूती नाही."
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि गेली दोन वर्षे सात महिने सत्तेवर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आणि आता नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी सुरु झालीय. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विधिमंडळात बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. त्याला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आलं. पण कोर्टानं आजच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानं उद्धव ठाकरे त्याआधीच राजीनामा देऊन मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. मुख्यमंत्रिपदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा त्यांनी दिला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आज गोव्यातून मुंबईत येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :