Maharashtra Goseva Ayog: फडणवीसांचे आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास, गोवंश योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना
Maharashtra Goseva Ayog: महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून गोसंवर्धन गोवंश योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी 70 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सोलापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास गेलं आहे. राज्यात गाईंची काळजी घेण्यासाठी गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असून शेखर मुंडदा यांनी त्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. राज्य सरकारने नेमलेल्या या आयोगात सहा सदस्य असणार आहेत.
गोवंशाचे महाराष्ट्रात संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी गोसेवा आयोगाची स्थापना झाली आहे. त्यामुळे ज्याला आता गाय नाईलाजाने विकावी लागत असेल त्यांनी संपर्क साधावा, आयोग ती गाय विकत घेऊन गोशाळेत पाठवेल असे आवाहन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केले आहे. गोपालक आणि गोरक्षकांच्या पाठीमागे आता महाराष्ट्र गोरक्षक आयोग उभा राहिल असेही मुंदडा यांनी सांगितले. आज आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुंदडा यांनी विठुरायाचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात केली.
देशी गायीचे संगोपन हाही यामागचा प्रमुख उद्देश असून गायीपासून मिळणारे शेण, गोमूत्र, दूध याला फार मोठी मागणी आहे. याबाबत जनजागृतीचे काम देखील आयोग करणार आहे. राज्यात सध्या पाच ते सहा लाख गायी असल्याची माहिती असून राज्यातील सर्व गोशाळांची नोंदणी आणि गायीच्या टॅगिंग कामाला देखील सुरुवात होणार असल्याचे मुंदडा यांनी सांगितले. गायीचे जीव वाचवताना जीव गमावलेल्या गोरक्षकांना देखील मदत करण्याची आयोगाची भूमिका असून सर्व गोरक्षकांचा विमा उतरविण्याचा संकल्प आज मुंदडा यांनी केला आहे.
आता गोसंवर्धनासाठी आर्थिक मदत करणाऱ्या मोठ्या कंपन्यांना 12 A आणि 80 G मधून सवलत दिली असल्याने अशा कंपन्यांनी आपल्या CSR फंडातून मदत करण्याचे आवाहन देखील मुंदडा यांनी केले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोवर्धन गोवंश योजना दिली गेली असून यातून राज्यातील गोशाळांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. गायीच्या गोठ्यात पत्राशेड, चार आणि दैनंदिन खर्चासाठी जवळपास 70 कोटींची रक्कम दिली जाणार आहे. यात 50 गायी असणाऱ्या गोशाळांना पाच लाख, 100 गायीच्या गोशाळेला 10 लाख आणि 200 गायीच्या गोशाळेला 15 लाखांचे अनुदान देण्यात येणार असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.
कोणताही शेतकरी आर्थिक परिस्थिती खालावल्यानंतरच आपल्या जवळची गाय विकत असतो आणि मग ती कसायाकडे जाते आणि त्यानंतर अनेक प्रश्न तयार होतात. हे टाळण्यासाठी गोसेवा अयोग एक टोल फ्री नंबर देणार असून ज्या शेतकऱ्याला आपल्या परिस्थितीमुळे गाय विकण्याची वेळ येईल त्यांनी आयोगाकडे संपर्क साधल्यास अयोग ती गाय विकत घेऊन गोशाळेत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही शेखर मुंदडा यांनी सांगितले.
ही बातमी वाचा: