Maharashtra Flood: पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून मदतीचा जीआर जारी, कशी मिळणार मदत?
महाराष्ट्रामध्ये पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला असून पूरग्रस्तांना मदत देणारा जीआर जारी करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना मागील महिन्यात महापूराचा फटका बसला होता. सातारा, सागली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरीत परिस्थिती बिकट होती. पुरात झालेल्या नुकसानासाठी पूरग्रस्तांना मदत देणारा जीआर जारी करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे 48 तासांपेक्षा अधिक कालावधीत क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असण्याची अट शिथिल करण्यात आली.
पूरग्रस्तांना कशी मिळणार मदत?
- कपड्यांच्या नुकसानाकरता प्रति कुटुंब 5 हजार रुपये
- घरगुती भांडी वस्तू नुकसानाकरता प्रति कुटुंब 5 हजार रुपये
- 48 तासांपेक्षा अधिक कालावधीत क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असण्याची अट शिथिल
- पूर्ण नष्ट झालेल्या कच्च्या-पक्क्या घरासाठी दीड लाख रुपये प्रति घर मदत खालील प्रमाणे
- अंशतः पडझड (50टक्के) 50 हजार रुपये प्रति घर
- अंशतः पडझड (25टक्के) 25 हजार रुपये प्रति घर
- अंशतः पडझड (15टक्के) 15 हजार रुपये प्रति घर
- नष्ट झालेल्या झोपडीसाठी प्रति झोपडी 15 हजार रुपये
- दुधाळ जनावरे 40 हजार
- ओढकाम करणारी जनावरे 30 हजार रुपये
- मेंढी, बकरी 4 हजार रुपये
- दुकानदार, बारा बलुतेदारांना 50 हजार रुपयांची मदत
- टपरीधारक 10 हजार रुपये
- कुक्कुटपालन 5 हजार रुपये
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक, कारागीर सर्वानाच झळ बसली आहे. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेहमीच्या निकषापेक्षा वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.