Maharashtra Din LIVE Updates : राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह; वाचा प्रत्येक अपडेट्स
यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्यानं महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होणार आहे. राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्साह आहे. वाचा प्रत्येक अपडेट्स....
LIVE
Background
Maharashtra Din 2022 : मराठी माणसासाठी महाराष्ट्र दिनाचा (Maharashtra Divas) उत्साह खूप मोठा असतो. मराठी माणूस हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे विविध कार्यक्रम, परंपरा दर्शवणाऱ्या मिरवणुका अशा सरकारी आणि खाजगी कार्यक्रमांनी या दिनाचा सोहळा साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र दिनाचा उत्साह कोरोनामुळं अनुभवता आला नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध नसल्यानं महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होणार आहे.
1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
काय आहे महाराष्ट्र दिनाचा इतिहास
21 नोव्हेंबर इ.स.1956 दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
पंडित नेहरुंनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आपल्या एका लेखात लिहितात 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडित नेहरुंनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी चंद्रपुरात विदर्भवाद्यांचे अनोखे आंदोलन
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी चंद्रपुरात विदर्भवाद्यांनी अनोखे आंदोलन केले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तळपत्या उन्हात कार्यकर्त्यांनी सरकारी कार्यालयांवर विदर्भाचे स्टिकर्स लावले आहेत. ज्या ठिकाणी फलकांवर महाराष्ट्र आहे, त्याच ठिकाणी विदर्भ असे स्टिकर्स लावल्याने पोलिसांनी काही जणांवर कारवाई केली आहे. विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांच्यासह कार्यकर्त्यांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच महाराष्ट्र मंडळाला एक पत्र पाठवून सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.
विविध प्राकृतिक संपदाओं से सुसज्जित महाराष्ट्र राज्य के स्थापना दिवस पर सभी महाराष्ट्र वासियों को 'महाराष्ट्र दिन' की हार्दिक शुभकामनाएं।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 30, 2022
महाराष्ट्र की निरंतर प्रगति व समृद्धि की कामना है।
Sharad Pawar On Maharashtra Din : शरद पवारांच्या महाराष्ट्र दिनी शुभेच्छा
सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या प्रयत्नांना बळी न पडता समाजात एकोपा कायम राखण्याचा, पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा तसेच आपल्या मेहनतीतून प्रगतीचा आलेख सतत उंचावत नेणाऱ्या सर्व कामगारांचा सन्मान करण्याचा निर्धार करूया. सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा!
सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या प्रयत्नांना बळी न पडता समाजात एकोपा कायम राखण्याचा, पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा तसेच आपल्या मेहनतीतून प्रगतीचा आलेख सतत उंचावत नेणाऱ्या सर्व कामगारांचा सन्मान करण्याचा निर्धार करूया. सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा! pic.twitter.com/e7obUWOTNi
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 1, 2022
राज्याच्या कामाबाबत कौतुक : वस्त्रोद्योग मंत्री शेख
वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख म्हणाले, कोविड-19 सारख्या कठीण काळातही महाराष्ट्र प्रगती करत राहिला. कोविड काळात राज्याने केलेल्या उपाययोजनांबाबत जागतिक आरोग्य संघटना व आयसीएमआरनेही कौतुक केले आहे. मुंबईने देशाच्या विकासात नेहमीच मोठा हातभार लावला आहे. मुंबईची ही तत्परता या संकटकाळातही पुन्हा देशाने पाहीली.
प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित केलेले हे सचित्र प्रदर्शन राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती नक्कीच लोकांपर्यंत घेऊन जाईल, असा विश्वासही मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केला.
या प्रदर्शनाचे फित कापून दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनस्थळी प्रारंभी प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. दीपक कपूर यांनी प्रदर्शनाबाबत माहिती दिली. मुंबईतील वरळी सी-फेस येथे कॉमन मॅन पुतळा परिसरात आणि रमाडा हॉटेल मागील जुहू बीच येथे हे प्रदर्शन दि. १ ते ५ मे या कालावधीत ही प्रदर्शने सर्वसामान्यांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्याची विकासाच्या आघाडीवर चौफेर कामगिरी- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
राज्य शासनाने कोविड काळातही विकासकामांमध्ये खंड पडू न देता सर्व क्षेत्रात चौफेर कामगिरी केली आहे. राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रातिनिधिक सचित्र प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. सचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून योजना व विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मुंबई शहरचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने वरळी सी-फेस, कॉमन मॅन पुतळा परिसरात आयोजित सचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. ठाकरे व मंत्री अस्लम शेख बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सदस्य सुनील शिंदे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर, संचालक गोविंद अहंकारी, संचालक दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री ठाकरे म्हणाले, कोविड-१९ सारख्या महासंकटासोबतच महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींचा सामना करत राज्य शासनाने विकासकामांमध्ये सातत्य ठेवत चांगली कामगिरी केली. कोविड कालावधीत राज्यातील अर्थव्यवस्था कार्यान्वित ठेवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या. राज्य शासनाच्या या कामगिरीस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शन सारखे उपक्रम महत्वाचे आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या विभागीयस्तरावर आयोजित प्रातिनिधिक प्रदर्शनांना नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.