Ajit Pawar : राज्य सहकारी बँकेवर ईडीची कुठलीही छापेमारी नाही : अजित पवार
राज्य सहकारी बँकेशी संबधित एकूण 7 ठिकाणी ED कडून धाडी टाकल्या असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
![Ajit Pawar : राज्य सहकारी बँकेवर ईडीची कुठलीही छापेमारी नाही : अजित पवार Maharashtra Deputy CM Ajit Pawar on ED not raiding Maharashtra State Co-operative Bank Ajit Pawar : राज्य सहकारी बँकेवर ईडीची कुठलीही छापेमारी नाही : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/02/a75cd8901c0f501ca91d72760dc531cb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : राज्य सहकारी बँकेशी संबधित एकूण 7 ठिकाणी ED कडून धाडी टाकल्या असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्य सहकारी बँकेवर ईडीची छापेमारी किंवा चौकशी झालेली नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. या संदर्भात खोट्या बातम्या दिल्या जात आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. पवार यावेळी म्हणाले की, राजू शेट्टी यांचा पत्ता कट हेमंत टकले यांना संधी या बातम्या कुठून येतात कळत नाही. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, असंही अजित पवार म्हणाले.
मंदिरं खुली करण्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मंदिरे खुली करा हा भावनिक मुद्दा आहे. यावर आंदोलन करून काही पक्ष, काही जण राजकीय इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत ते म्हणाले की, इतर राज्यांनी शाळा सुरू केल्या असल्या तरी आम्ही टास्क फोर्सला विचारून निर्णय घेणार आहोत. दिवाळी पूर्वी सुरू कराव्यात किंवा नंतर असे 2 मतप्रवाह आहेत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होत आहे. त्याचा फटका माझ्या सारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात आहे. मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले.
पुण्यातील आढावा बैठकीनंतर बोलताना अजित पवार म्हणाले की, शाळा सुरू करण्याचा निर्णय होईल त्यानंतर ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांना शाळेत प्रवेश द्यावा. गणेशोत्सवात मंडळं सहकार्य करत आहेत. साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे अजून आपण चर्चा करून निर्णय घेऊ,पहिल्या दिवशी गर्दी वाढली तर दुसऱ्या दिवशी पासून कडक नियम करू, असं पवार म्हणाले.
केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, अच्छे दिन येणार म्हणून लोकांनी निवडून दिलं. पण पेट्रोल डिझेल गॅस किमती वाढल्या की सामान्य जनता महागाईनं ग्रासून जाते. कोरोनामुळे केंद्राने हे दर आवाक्यात ठेवायला हवे होते. आता अधिवेशन झालं त्यामुळे आता यावर केंद्राने लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, राज्यात अनेकांची आहे मंदिरं उघडली पाहीजे. पण जर गर्दी झाली तर कोरोना वाढू शकतो. केंद्राने सण साध्या पद्धतीने करा असे सांगितले आहे. भाजपने त्याच्या केंद्रातील आरोग्य विभागाने काय सांगितले आहे ते पाहावे, असंही पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)