Kokan Refinery Project: रिफायनरी प्रकल्प होणारच, आता माघार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
Kokan Refinery Project: कोकणातील रिफायनरी प्रकल्प हा पूर्ण होणारच असून महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Kokan Refinery Project: रिफायनरी प्रकल्प कोकणातील (Refinery Project) नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. आम्हाला हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राच्या विकास महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या शंकांचे निरसन करू, असेही फडणवीस यांनी म्हटले. 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली. क
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण सुरू करण्यात आले आहे. या कामाला स्थानिकांकडून मोठा विरोध सुरू करण्यात आला आहे. अनेक ग्रामस्थांनी रिफायनरीविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बारसूमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, या रिफायनरीमुळे निसर्गाला कोणताही धोका नाही. आम्हाला हा रिफायनरी प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. बारसू गावात सध्या रिफायनरीच्या ठिकाणी बोअर मारले जात आहेत. ही जागा रिफायनरीसाठी योग्य असल्याचे अहवाल आल्यानंतर रिफायनरी उभी राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून निसर्गाला कोणताही धोका पोहचणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
राज्याचा मोठा फायदा होणार
कोकणातील रिफायनरी प्रकल्पामुळे राज्याचा मोठा विकास होणार असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. या प्रकल्पामुळे प्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. या रिफायनरी प्रकल्पात असणाऱ्या तीन कंपन्यांनी वेगळ्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले होते. मात्र, आपण हा प्रकल्प अखंडितपणे राज्यात सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता हा प्रकल्प एकाच ठिकाणी कोकणात उभा राहत आहे. रिफायनरी विरोधात अपप्रचार सुरू आहे. त्यातून विरोध होत असल्याचे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडीचे सरकार असताना रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या जागेसाठी त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. आता, त्यांची भूमिका विरोधाची असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
सगळ्या आंदोलनात तेच चेहरे कसे?
देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. आंदोलकांपैकी काहींनी सुपारी घेतली आहे. मोजके आंदोलक हे खरे असतीलही, या आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. आरेतील कारशेडलादेखील विरोध करण्यात आला होता. कोणताही प्रकल्प आला तरी विरोध करतात. कोणताही स्टेक नसणाऱ्यांकडून विरोध सुरू असल्याचा आरोपही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ही मंडळी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड उभे राहत आहेत. निष्पाप लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोध सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी समृ्द्धीला विरोध केला. ज्या गावात सभा घेतली त्या ठिकाणी 100 टक्के जमीन या प्रकल्पाला मिळाली. लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.
जामनगरच्या रिफायनरीमुळे फायदा
देशातील सगळ्यात मोठी रिफायनरी सध्या गुजरातमधील जामनगर येथे आहे. जामनगरमधील रिफायनरीमुळे गुजरात राज्याला फायदा झाला आहे. जामनगर रिफायनरीच्या जागेत आंब्यांची झाडे लावण्यात आली आहे. या आंब्यांची निर्यात केली जाते. त्यातून गुजरातचा फायदा होत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.