(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis on Refinery Project: आरे, समृद्धी, पोर्ट अन् आता रिफायनरीला विरोध; ही सुपारी कुणाकडून? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
Devendra Fadnavis on Refinery Project: आरे, समृद्धी ते रिफायनरीला विरोध करणाऱ्यांनी कोणाची सुपारी घेतली आहे, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
Devendra Fadnavis on Refinery Project: आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, त्यानंतर मध्यंतरी आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणार्यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले. आता या विरोधाची सुपारी कुणाकडून असाही प्रश्न त्यांनी विचारला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) प्रचारासाठी आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या तीन कंपन्या एकत्र येऊन ही रिफायनरी करीत आहेत. प्रारंभीपासून त्यांनी रिफायनरीला विरोध केला. मग सत्तेत आले आणि ही रिफायनरी बारसूला करायचे, हे त्यांनीच ठरविले, तसे पत्र पंतप्रधानांना पाठविले. आता काम सुरु झाले, तर पुन्हा विरोध सुरू असल्याचे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना-ठाकरे गटावर निशाणा साधला.
विरोधकांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्याशी चर्चा करायला आणि त्यांचे गैरसमज दूर करायला आम्ही तयार आहोत. पण, राजकारणासाठी जे विरोध करीत आहेत, त्यांना आम्ही सहन करणार नाही. अशीच रिफायनरी जामनगरमध्ये आहे, तेथील आंबे निर्यात होतात. त्यामुळे कोणतेही नुकसान रिफायनरीमुळे होत नाही, हे सिद्ध झाले असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ही ग्रीन रिफायनरी आहे. त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. पण, खोटे बोलून विरोधक आणखी किती मोठे नुकसान महाराष्ट्राचे करणार आहेत? एक झाड सुद्धा त्या जागेवर नाही. कातळशिल्पाची जागा सोडून देऊ, हेही आम्ही सांगितले. काही विरोध करणारे राजकारणासाठी तर काही बाहेरच्यांना सोबत घेऊन विरोध करणारे आहेत. मग आम्हाला हा प्रश्न विचारावा लागेल की, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन विरोध करता, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कर्नाटक निवडणुकीत फडणवीस प्रचाराच्या रिंगणात
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटकात भाजपाच निवडून येणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत ही आज जगातील पाचव्या क्रमांकांची अर्थव्यवस्था बनली आहे. 2030 पर्यंत भारत ही जगातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. ग्रामीण भारतात अनेक कामे झाली. शौचालयांचे निर्माण, घरांघरात वीज, पाणी, उज्वला सिलेंडर आदी योजना राबविल्या गेल्या. गरिब कल्याणाचा एक मोठा कार्यक्रम राबविला गेला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात इंडी येथे प्रचार सभेत बोलताना सांगितले. केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, खासदार संजयकाका पाटील आणि इतरही स्थानिक नेते या जाहीर सभेला उपस्थित होते.