बहिणीचा मोबाईलमध्ये फोटो काढल्यावरुन खून, नांदेडच्या धर्माबादमधली घटना
नांदेडच्या धर्माबादमध्ये बहिणीचा मोबाईल फोनमध्ये फोटो काढल्यावरुन खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये दोन 20 वर्षीय तरुणांनी त्यांच्याच वयाच्या मुलाचा खून केला. मोबाईल फोनमध्ये बहिणीचा फोटो काढल्याच्या रागातून ही घटना घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आकाश शिवराम भंगारे असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साठेनगर भागात असलेल्या राम मंदिराजवळ घडली. पोलिसांनी या प्रकरणी अडीच तासातच दोन आरोपींना अटक केली. दोन्हीही आरोपींचं वय 20 वर्षे आहे.
शहरातील साठेनगर भागात असलेल्या राम मंदिर परिसरातील झाडाखाली आकाश शिवराम भंगारे हा बसला होता. त्यावेळी त्याने आरोपी सचिन अरुण पत्रेने आकाश भंगारेला माझ्या बहिणीचा मोबाईलमध्ये फोटो का काढलास असा जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. वादावादीचं रुपांतर हाणामारीत झालं. सचिन आणि त्याचा मित्र रोहित भगवान जोंधळे या दोघांनी आकाश भंगारेला बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आकाशचा मृत्यू झाला.
दोन्ही आरोपींविरोधात भारतीय दंडविधान कलम 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना धर्माबादच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.