Coronavirus: कोरोनाचा धोका वाढला.. राज्यातील रुग्णसंख्या हजारपार, एकाच दिवसात 1,115 रुग्णांची नोंद, नऊ जणांचा मृत्यू
Maharashtra Coronavirus Update : राज्यात आज कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ झाल्याचं दिसून येतंय.
Maharashtra Coronavirus Update : राज्यातील कोरोनाचा धोका सातत्याने वाढताना दिसत असून आज एकाच दिवसात रुग्णसंख्येने हजारांचा टप्पा गाठला आहे. आज राज्यात कोरोनाच्या 1,115 रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे तब्बल नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी राज्यात 919 रुग्णांची नोंद झाली होती तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेने आज दोन्ही संख्येत मोठी भर पडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे.
राज्यात आज कोरोनामुळे नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला असून गेल्या काही महिन्यांतील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. राज्यात आज एकूण 560 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येमध्येही वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यात आज कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने पाच हजारांचा टप्पा गाठला असून ती संख्या 5,421 इतकी झाली आहे.
राज्यात आतापर्यंत 79,98,400 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्के इतकं झालं आहे. तर राज्यात आत कोरोनामुळे नऊ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 9.40 टक्के चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
Maharashtra Coronavirus Update : राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत वाढ
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असून आजघडीला राज्यात 5,421 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत आढळते. मुंबईत सध्या 1577 सक्रिय रुग्णसंख्या असून त्या खालोखाल ठाण्यात 953 आणि पुण्यात 776 सक्रिय रुग्णसंख्या आढळते.
मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य
कोरोना पुन्हा एकदा (Coronavirus Mumbai) डोकं वर काढू पाहतंय, त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगपालिकेने (BMC) तयारी सुरु केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Hospitals) सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती (Mask Compulsory) करण्यात आली आहे.
सतर्क राहण्याची आवश्यकता
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोरोना लसीकरणासंदर्भात आढावा घेतला. केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी सांगितले की, "आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे." लोकांमध्ये अनावश्यकपणे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना दिले.