Coronavirus Cases Updates: महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं, आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
कोरोना व्हायरसनं साऱ्या देशाला विळखा घातलेला असतानाच महाराष्ट्रातही चित्र काहीसं वेगळं नव्हतं. पण, राज्य शासनानं राबवलेल्या काही उपाययोजना, लावलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर या संकटकाळातही राज्यातून काही अंशी दिलासादाय़क बातमी समोर येत आहे.
मुंबई : कोरोना Coronavirus व्हायरसनं सर्वत्र कहर केलेला असतानाच महाराष्ट्रातून मात्र एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. जवळपास मागील दीड महिन्यांची आकडेवारी पाहता राज्यातील कोरोना परिस्थिती हळुहळू सुधारत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सातत्यानं वाढणारे कोरोनारुग्ण आणि नियमांचं उल्लंघन करणारे अनेक नागरिक यांनी शासनाची डोकेदुखी वाढवलेली असतानाच आता मात्र हे चित्र बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सातत्यानं वाढणारा कोरोना बाधितांचा आकडाही आता कमी होत आहे शिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळं राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं म्हणावं लागेल. असं असलं तरीही धोका मात्र टळलेला नाही ही बाबही तितकीच महत्त्वाची.
राज्यात 1 नोव्हेंबरला कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या 16 लाख 83 हजार 775 इतकी होती. तर, सक्रिय रुग्णसंख्या 1 लाख 25 हजार 109 इतकी होती. 5 डिसेंबरला एकूण रुग्णसंख्या 18 लाख 47 हजारांवर होती. तर, उपचार घेणाऱ्या अर्थात सक्रिय रुग्णांची संख्या 82 हजार 849 इतकी कमी झाली होती. ही एकंदर कडेवारी पाहता कोरोनातून सावरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची बाब समोर येत आहे.
राज्यात लसीकरण केव्हा, काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे...
राज्य खरंच कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे का, असं विचारलं असता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेटवर भर दिला. राज्यातील रिकव्हरी रेट हा 94 टक्क्यांवर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील कोरोना रुग्णांचा 'डबलिंग रेट'ही 350 दिवसांवर गेल्याचं ते म्हणाले.
‘एपीबी माझा’शी संवाद साधताना कोरोना संदर्भात राज्यातील कॅज्युअल्टी रेट, सीएफआर रेट कमी असल्याचा संदर्भ देत रुग्णवाढीचं प्रमाण हे राज्यात अवघ्या 0.02 टक्क्यांवर असल्याचा मुद्दा टोपे यांनी अधोरेखित केला.
कोरोन लसीकरणासाठी काही लसींची चाचणी अखेरच्या टप्प्यात असून, सदर कंपन्यांनी लसीकरणासाठी अधिकृत परवानगीही केंद्राकडे मागितली आहे. ज्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचं टोपे म्हणाले. लसीकरणासाठी राज्यात मनुष्बळ, यंत्रणा, कोल्डचेन अशा सर्व घटकांवर राज्याची पूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळं उद्यापासूनही लसीकरण सुरु केल्यास महाराष्ट्र त्यासाठी पूर्ण तयार आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
‘शिस्त पाळली तर धोका कमी’
राज्यातील नागरिकांनी शिस्त पाळत, मास्कचा वापर करत आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केल्यास रुग्णसंख्या वाढीवर निय़ंत्रण आणता येऊ शकतं असंही टोपे म्हणाले. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणातच राहील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी चिंतेचं कारण नसल्याचं सांगत एक प्रकारे मोठा दिलासाच दिला.
देशातील सर्वात कमी दरात कोरोना चाचणी
देशभरात जिथं कोरोना चाचण्यांच्या दरांवरुन अनेकांना घाम फुटत आहे, तिथंच महाराष्ट्रात मात्र हे दर सातत्यानं कमी करण्य़ात आले आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या माहितीनुसार देशात 4500 रुपयांना कोरोना चाचणीचे दर उपलब्ध असतानाच राज्यात हे दर थेट 700 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. त्यामुळं सर्वतोपरी राज्य खऱ्या अर्थानं कोरोनाशी लढा देण्यासाठी त्यात यशस्वी होण्याच्याच दिशेनं वाटचाल करत आहे असं म्हणायला हरकत नाही.