Corona Vaccine Shortage LIVE UPDATES | परभणीत उद्या पुरेल एवढेच लस साठा शिल्लक
महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सातारा, सांगली आणि गोंदिया जिल्ह्यातील लसीकरण साठ्याअभावी थांबलं आहे.
LIVE
Background
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे. तर कोल्हापुरातील लसीकरण आज दिवसभरात कधीही ठप्प होऊ शकतं. तर दुसरीकडे विदर्भातील अमरावती, वर्धा, बुलढाणा, गोंदियात सुद्धा लसीचा तुटवडा जाणवतोय. गोंदियातील लसीकरण सुद्धा बंद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कोरोना लसीचा साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण मोहीम अडचणीत येऊ शकते.
महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. या दाव्यावरुन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी एक परिपत्रक पोस्ट करत त्यातून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
परभणीत उद्या पुरेल एवढेच लस साठा शिल्लक
परभणी जिल्ह्यात उद्या पुरेल एवढाच लससाठा शिल्लक राहिला असून त्यामुळे उद्या बारा लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे तर 45 ठिकाणी लस उद्या देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 4 हजार 850 डोसेस आजपर्यंत मिळाले होते. यातील 95 हजार पेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 57 केंद्रावर लसीकरण केले जात आहे. सध्या 45 केंद्रावर उद्या पुरेल एवढा लस साठा शिल्लक असुन उद्या 12 केंद्रावरील लसीकरण बंद असणार आहे. रविवारी जिल्ह्यासाठीचा नवीन लस साठा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती लसीकरण प्रमुख डॉ. रावजी सोनवणे यांनी दिलीय.
कोरोना लस संपल्यामुळे मुंबईच्या अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात लसीकरण बंद
मुंबईत अंधेरी पूर्वेतील सुप्रसिद्ध सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोना लस संपल्यामुळे आज सकाळपासून लसीकरण बंद आहे. आज संध्याकाळपर्यंत लसीचा साठा उपलब्ध झाला नाही तर उद्या देखील लसीकरण बंद राहिल.
बीकेसीमधलं जम्बो कोविड लसीकरण केंद्र लसीच्या पुरवठ्याअभावी बंद
मुंबईतील सर्वात मोठ कोविड लसीकरण केंद्रही बंद झालं आहे. बीकेसीमधलं जम्बो कोविड लसीकरण केंद्र लसीच्या पुरवठ्याअभावी बंद झालं आहे. सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या लोकांना बाहेर येऊन परत जाण्याची विनंती करण्याची वेळ डॉक्टर आणि पोलिसांवर आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 300 कोविशिल्ड आणि 3700 कोवॅक्सिन उपलब्ध, 91 केंद्रावरचे लसीकरण बंद
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 300 कोविशिल्ड आणि 3700 कोवॅक्सिन उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 98 पैकी 91 लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे काम बंद असून फक्त 7 ठिकाणी लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात 95 ऑक्सिजन बेड्स पैकी केवळ 10 उपलब्ध आहे तर 50 व्हेंटिलेटर बेड्स पैकी 3 उपलब्ध आहेत.
लसीचा साठा नसल्यानं आजपासून बारामतीतील लसीकरण बंद
लस संपल्याने बारामतीतील लसीकरण आजपासून बंद. आतापर्यंत 52 हजार 200 नागरिकांना लस दिली आहे. बारामती तालुक्यात एकूण 32 ठिकाणी लसीकरण सुरु होते. काल दुपारी लस संपली.