(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 6493 नव्या रुग्णांची नोंद तर 6213 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज 6493 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 6213 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
मुंबई : राज्यात आज 6493 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 6213 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 2771 रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात बी ए.5 आणि बी ए. 4 व्हेरीयंटचे आणखी 5 रुग्ण
राज्यात पहिल्यांदाच बीए5 व्हेरीयंट आणि बीए 4 व्हेरीयंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये तीन पुरूष आणि दोन स्त्रिया आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेलल्या बी ए 5 आणि बी ए. 4 रुग्णांची संख्या 54 झाली आहे. यातील 15 पुण्यातील, मुंबईतील 33, नागपूरमधील चार आणि ठाण्यातील दोन रुग्ण आहेत
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,90,153 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 24,608 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 24, 608 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 12727 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5301 सक्रिय रुग्ण आहेत
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
गेल्या 24 तासांत देशात 11 हजार 739 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही चिंताजनक बाब आहे. देशात सध्या 92 हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शनिवारी दिवसभरात 10 हजार 917 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 92 हजार 576 इतकी झाली आहे.
आय सी एम आर पोर्टल मधील तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील कोविड रुग्णांची संपूर्ण दैनंदिन माहिती मिळण्यास काल अडचण आली होती. कालची उर्वरित रुग्ण संख्या आजच्या अहवालात समाविष्ट करण्यात आल्याने आज रुग्ण संख्या अधिक दिसते आहे.