Maharashtra Corona Update : राज्यात आज 704 नव्या कोरोना रुग्णांची भर, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव
Maharashtra Corona Update : ज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 18 इतकी झाली आहे. नऊ रुग्णांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात रविवारी 704 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 699 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 16 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12% एवढा आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची 66,43,883 इतकी झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 64,92, 504 इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.72% इतके झाले आहे. राज्यात सध्या 75,313 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 855 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 6,441 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव -
मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरियंटने उपराजधानी नागपूरमध्ये शिरकाव केलाय. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नागपूरमध्ये 40 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ओमायक्रोन पॉसिटीव्ह आढळलेल्या 40 वर्षीय रुग्णाचा पश्चिम आफ्रिकेतील प्रवासाचा इतिहास आहे. हा व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणीसह जीनोम सिक्वेन्सिंग ही करण्यात आली होती. त्यानंतरच त्याला ओमायक्रोन संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो रुग्णालयात उपचार घेतोय. संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आले आहेत. त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. संबंधित रुग्णच्या संपर्कातील इतर लोकांची ट्रेसिंग केली जात असून त्यांच्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत. चार डिसेंबर रोजी संबधित व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. जनुकीय चाचणीत (जिनोम सिक्वेन्सिंग) त्याला ओमायक्रॉन असल्याचे निदान झाले आहे.
राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटची संख्या -
नागपूरमध्ये रविवारी ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार दक्षिण आफ्रिकेहून आलेला नागपूर येथील ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 18 इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईत 5, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुणे मनपामध्ये एक, कल्याण डोंबिवली 1 आणि नागपूरमध्ये एक असे रुग्ण आढळले आहेत. 18 पैकी 9 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. नऊ रुग्णांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात एक नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 107 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 26 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.