Maharashtra Corona Update : राज्यात आज 3883 रुग्णांची भर तर 2802 रुग्ण बरे, दोन रुग्णांचा मृत्यू
Coronavirus : राज्यातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 1.86 टक्के इतकं झालं असून रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.85 टक्के इतका आहे.
मुंबई: गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत आज काहीशी घट झाल्याचं दिसून आलं. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या तीन हजारांच्या आत आली असून आज 3883 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2802 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2054 रुग्णांची भर पडली आहे.
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज एकूण दोन कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,61,032 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.85 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 22,828 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 13,613 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 4869 सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील स्थिती
देशात 13 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीतील रुग्ण संख्येचा क्रमांक लागतो.
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 68 हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात 68 हजार 108 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 8 हजार 148 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा सरासरी दर 0.16 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.63 टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशात कोरोना महामारी सुर झाल्यास आतापर्यंत एकूण 4 कोटी 26 लाख 90 हजार 845 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.