Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, आज 2,515 रुग्णांची नोंद तर सहा जणांचा मृत्यू
Covid 19 : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबई: गुरुवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. आज राज्यात 2515 नव्या रुग्णांची (Corona Update) भर पडली आहे तर 2449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 78,67,280 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.97 टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात सध्या 14,579 इतकी सक्रिय रुग्णसंख्या असून स्रवाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यामध्ये आढळतात. पुण्यात 5121 इतके रुग्ण तर मुंबईमध्ये 1871 सक्रिय रुग्ण आढळतात.
बीए 5 व्हेरियंटच्या दोन रुग्णांची भर
राज्यात आज बीए 5 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण परराज्यातील असून पुण्यात काही कामानिमित्ताने आले होते. राज्यात बीए 4 आणि बीए 5 रुग्णांची संख्या ही 160 वर पोहोचली आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 93 रुग्ण आढळतात. त्यानंतर मुंबईमध्ये 51 तर ठाणे 5, नागपूर आणि पालघरमध्ये प्रत्येकी 4 आणि रायगडमध्ये 3 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यातील स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या 142 इतकी झाली असून सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमध्ये (43) आढळतात.
देशातील स्थिती
मागील 24 तासांत 21 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 60 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 1 लाख लाख 49 हजार 482 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 21 हजार 219 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 31 लाख 71 हजार 653 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. देशात एकूण 5 लाख 25 हजार 930 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमावला आहे.