'राज्यात 2 कोटी लसीकरण! मग या लशी जमिनीतून उगवल्या की आकाशातून पडल्या?' : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील कोरोना उपाययोजनांसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर चांगलेच टीकास्त्र सोडले आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीचे नेते कांगावखोर आहेत असा आरोप केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना उपाययोजनांसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर चांगलेच टीकास्त्र सोडले आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीचे नेते कांगावखोर आहेत असा आरोप केला आहे. महाराष्ट्रात दोन कोटी लोकांचा लसीकरण झालं मग या लशी जमिनीतून उगवल्या आकाशातून पडल्या? असा सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या दुप्पट आहे पण तिथं फक्त दीड कोटी लशी पुरवल्या आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्क्रिप्ट लिहिलेली आहे. सकाळी उठून हे केंद्र सरकारने करावे ही केंद्र सरकारची जबाबदारी असं बोलतात. आरोग्य ही राज्याची व्यवस्था आहे असे केंद्र सरकारने कधीही सांगितलं नाही. उलट भरघोस मदत महाराष्ट्राला मिळाली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर सहा महिने वापरले नाहीत
फडणवीस म्हणाले की, सर्वात जास्त ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला. सर्वात जास्त व्हेंटिलेटर महाराष्ट्राला मिळाले. पण महाविकास आघाडीचे नेते सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलत आहेत कांगावा करत आहेत, असं ते म्हणाले. आज महाराष्ट्र राज्य व्हेंटिलेटर आहे ते केंद्र सरकारने दिलेले आहेत. केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर सहा महिने वापरले नाहीत त्यामुळे ते खराब झाले आहेत. त्यात थोडीशी दुरुस्ती करून पुन्हा हे व्हेंटिलेटर सुरू झाले आहेत. महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर मिळाले पण ते सांगितलं जात नाही. पण काही व्हेंटिलेटर खराब झाले की लगेच कांगावा केला जात आहे, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना मदत केली जाणार
फडणवीस म्हणाले की, चक्रीवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांचा मोठे नुकसान झालं आहे. नुकसान झाले सरकारने आता तातडीने मदत करायला हवी परंतु अद्याप गेल्या वेळी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. सरकारने खुल्या देणारी मदत केली तर चक्रीवादळात ज्यांचे नुकसान झालं ते बाहेर पडू शकतील. आम्ही पूरग्रस्तांचे नुकसान झालं होतं त्यावेळी घरांची पडझड झाली त्यांना आम्ही घर बांधेपर्यंत किरायाचे पैसे सुद्धा दिले होते. पण हे सरकार तसं करत नाही, असं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना मदत केली जाणार आहे. केंद्र सरकार भेदभाव करत नाही. कर्नाटक किंवा गोवा या भाजपशासित राज्यांतही अद्याप मदत झालेली नाही म्हणजे दुजाभाव केला जातो असं होत नाही. केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की नुकसान झालेल्या सर्व राज्यांना मदत केली जाईल पण महाविकास आघाडीचे काही लोक फक्त खोटं बोलण्याचा काम करत आहेत. राज्य सरकार लोकांना तातडीचे मदत करू शकतो परंतु अद्याप राज्य सरकारने मदत केली नाही, असं ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा अद्याप प्रस्तावच तयार नाही
मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही दिलं पण आघाडी सरकारला ते टिकवता आले नाही. आमचं सरकार असतानाही काही लोक सुप्रीम कोर्टात गेले होते. पण सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली. या सरकारला मराठा आरक्षणाबद्दल गांभीर्य नाही. मुख्यमंत्री ठाकरे हे अशोक चव्हाणांकडे जबाबदारी देतात आणि अशोक चव्हाण काहीतरी बोलत असतात. सुप्रीम कोर्टानं याआधीचे पाच आयोग त्या वेळच्या सरकारने का फेटाळले नाहीत? असा सवाल विचारला होता त्याचे उत्तर राज्य सरकारला देता आले नाही. गायकवाड आयोगाची बाजू गांभीर्याने मांडायला हवी होती पण ती मांडली गेली नाही राज्य सरकारने अद्याप मागासवर्ग आयोगाच गठित केला नाही. केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. राज्यपालांना एक पानाचं निवेदन देऊन मराठा आरक्षण मिळणार नाही. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागून उपयोग काय राज्य सरकारचा अद्याप प्रस्तावच तयार झालेला नाही. पुन्हा नव्याने सर्वे करावे लागतील पुरावे गोळा करावे लागतील आणि त्यानंतर आरक्षण मिळू शकेल, असं फडणवीसांनी सांगितलं.
ते म्हणाले की, भाजप सुरुवातीपासून भूमिका आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये आणि मराठा समाजातील नेत्यांचीही तीच भूमिका आहे. मराठा समाज सर्व समाजाला घेऊन चालणारा आहे. त्यामुळे ओबीसींमध्ये आरक्षण द्या अशी त्यांची मागणी नाही. ओबीसी समाजामध्ये नवीन वाटेकरी नको, असं ते म्हणाले.
मुंबईचा पीआर केला जात आहे
ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात हे सरकार महाराष्ट्राचे नाही तर मुंबईचा असल्यासारखे वागत आहे. ग्रामीण भागामध्ये करोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत. नागपूरमध्ये राज्य सरकारने एकही कोविड सेंटर उभारले नाही. पुण्यामध्ये राज्य सरकारने एकही सेंटर उभारले नाही. मुंबईत सुद्धा कोविडच्या आकड्यांची फसवाफसवी केली जात आहे. मी अधिकारी किंवा महापालिकेत काम करणाऱ्यांना दोष देणार नाही. मुंबईचा पीआर केला जात आहे. मुंबईत मृत्यू झालेल्यांना इतर कारणांमध्ये दाखवलं जात आहे. परदेशी मीडियामध्ये मुंबईच्या कौतुकाच्या बातम्या छापून आणल्या जात आहेत. जर मुंबईचं कौतुक होत असेल तर जे मृत्युमुखी पडत आहेत त्यांची जबाबदारी कोणाची आहे? असा सवाल फडणवीसांनी केला.
मुंबईत कोविडच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. कोरोनाच्या काळात आम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोलणार नाही. तिसऱ्या लाटेसाठी आपण सज्ज आहोत का आणि त्यासाठी काय केलं पाहिजे. तिसर्या लाटेत बालकांवर परिणाम होऊ शकतो यासंदर्भात तात्काळ पावले उचलायला हवीत, असंही फडणवीस म्हणाले.
...तर सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही.
फडणवीस म्हणाले की, रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टच्या बाबी बाहेर आल्या तर या सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आपल्या अंतर्विरोधमुळे हे सरकार पडणार आहे आणि ही परिस्थिती आता येऊ लागली आहे. सध्या सरकार खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु अंतर विरोधामुळे हे सरकार पडणार आहे. पंढरपूरकरांनी राज्य सरकारच्या गैर कारभाराला कंटाळून भाजपचा उमेदवार निवडून दिला. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल आता कोरोनासोबत लढाई आहे. महाविकास आघाडी सरकारला भाजपसोबत लढण्यात स्वारस्य आहे. पण योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल.