Maharashtra Lockdown: लॅाकडाऊन वाढणार की निर्बंध; राज्य मंत्रिमंडळात आज निर्णय होणार
Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन वाढवायचा की निर्बंध लादायचे याचा निर्णय आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे.
मुंबई : राज्यातील लॉकडाऊन संपायला अवघे दोन दिवस उरलेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार की संपणार याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत होणार आहे. राज्यातील लॉकडाऊन तसेच लसीच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळात काय निर्णय होतो याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत आधीच काही संकेत दिले आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं की, आता राज्यात रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसून येतंय. याचं श्रेय लॉकडाऊनला जातंय. तर नागरिकांचा जीव वाचला पाहिजे, राजकारण न करता जनतेचे हित महत्वाचं आहे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. विदर्भात लॉकडाऊन करुनही अद्याप रुग्णांची संख्या कमी होत नाही, त्यामुळे विदर्भात लॉकडाऊन वाढवायचा की नाही याची चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.
कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही याची प्राथमिक चर्चा केली जाईल. यामध्ये शहरनिहाय कोरोनाग्रस्तांची आकडेवारी समोर मांडली जाईल, लॅाकडाऊनचा किती परिणाम सध्या होतोय आणि वाढवला तर किती परिणाम होईल यावर सगळं अवलंबून आहे.
गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लावले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यानंतर 22 एप्रिलपासून पुढील 15 दिवस लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली.
दुसऱ्या लाटेतून जाताना महाराष्ट्राला चांगलेच चटके बसले आहेत. राज्य आतापासूनच तिसऱ्या लाटेची तयारी करतंय, लॉकडाऊन वाढवला तर कोरोनासाठी लागणारी साधनसामुग्री वाढवतां येईल. जर पुन्हा लॉकडाऊन उघडण्याची घाई केली तर राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारतां येत नाहीय. त्यामुळे आता राज्याचे नेते कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतायत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. मंगळवारी 66 हजार 358 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 895 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.
मंगळवारी 67 हजार 752 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 36 लाख 69 हजार 548 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के झाले आहे. राज्यात आज 895 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.05 टक्के एवढा आहे.
महत्वाच्या बातम्या :