Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 902 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 12 जणांचा मृत्यू; ओमायक्रॉनचेही रुग्णही आढळले
Maharashtra Coronavirus Updates : महाराष्ट्रात शुक्रवारी 902 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 680 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Maharashtra Coronavirus Updates : महाराष्ट्रात शुक्रवारी 902 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 680 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 95 हजार 929 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12% एवढा झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 40 इतकी झाली आहे.
आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या सहा कोटी 74 लाख 41 हजार 806 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 47 हजार 840 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजे एकूण नमुण्यापैकी राज्यात 9.86 टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 79,556 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 886 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णाची भर -
शुक्रवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात आणखी आठ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी 6 रुग्ण पुणे, एक रुग्ण मुंबई आणि एक रुग्ण कल्याण डोंबिवली येथील आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 40 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यामध्ये मुंबईत 14, पिंपरी चिंचवड -10, पुणे ग्रामीण-6, पुणे मनपा -2 , कल्याण डोंबिवली – 2, उस्मानाबाद -2, बुलढाणा-1 नागपूर -1 ,लातूर -1 आणि वसई विरार -1 असे रुग्ण आढळले आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 25 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7 हजारांहून अधिक रुग्ण
देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 7 हजार 447 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 86 हजार 415 आहे. या महामारीमध्ये जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 76 हजार 869 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (गुरुवारी) 7886 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 62 हजार 765 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.