(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतेय, आजची आकडेवारी पहा
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात 6 हजार 843 नवीन रुग्णांचे निदान झालंय. तर 5 हजार 212 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 35 हजार 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. राज्यात आज 123 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतेय
राज्यात सध्या अहमदनगर जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही आता रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. आज सातारा 665, कोल्हापूर 582, सांगली 691, अशी रुग्णांची नोंद झालीय. तर भंडारा, वर्धा, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
मुंबईत गेल्या 24 तासात 364 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 364 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या शहरात 7681 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात दिवसभरात नवे 250 कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने 250 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 85 हजार 716 इतकी झाली आहे. शहरातील 327 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 74 हजार 193 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 987 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 28 लाख 39 हजार 685 इतकी झाली आहे.
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 792 रुग्णांपैकी 231 रुग्ण गंभीर तर 349 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 731 इतकी झाली आहे.
देशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
देशात जीवघेणा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन कोटी 13 लाख 17 हजार 901 झाली आहे. तसेच 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सद्यस्थिती.