(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? थोरात-पटोले वादावर एक सदस्यीय समिती
Congress : महाराष्ट्र काँग्रेसचे (Maharashtra Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या वादावर काँग्रेसनं एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसचे (Maharashtra Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पक्षांतर्गत कुठलीही तेढ नसल्याचे सांगितले आहे. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीरुन (Nashik Graduate Constituency Election) पटोले आणि थोरात यांच्यात अंतर्गत सगळं काही ठिक नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. बाळासाहेब थोरात नाराज असल्याचीही चर्चा झाली. त्यामुळं आता पटोले आणि थोरात यांच्या वादावर केरळमधील काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
काँग्रेस हाय-कमांडने गुरुवारी (16 फेब्रुवारी) केरळमधील दिग्गज नेते रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्र काँग्रेसमधील राजकीय परिस्थितीचे मूल्यांकन करुन पक्षाध्यक्षांना अहवाल देण्यास सांगितले आहे. द हिंदूशी बोलताना रमेश चेन्निथला म्हणाले की, पटोले आणि थोरात यांच्यातील वाद राज्यातील पक्षाच्या भल्यासाठी ताबडतोब सोडवावा लागेल. पक्षानं मला महाराष्ट्र काँग्रेसमधील सध्याच्या परिस्थितीचे आकलन करण्यास सांगितले आहे. तसेच लवकरात लवकर याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. मी अजून याबाबतच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत. मात्र, उद्या दौऱ्याबाबत मी वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती रमेश चेन्निथला यांनी दिली.
Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधरच्या उमेदवारीवरुन नाट्य
नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे विरुद्ध पटोले असा सुरू असलेला वाद आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचला आहे. विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून नाट्य रंगले होते. सत्यजित तांबे यांच्या झालेल्या विजयापासून नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस काहीशी दोन हात दूर राहिली असली, तरी त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. नाशिकमध्ये आता राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत दुहीमुळे पटोले आणि थोरात असे दोन गट पडल्याने नाशिक शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचे काम केल्याने आणि त्यांना समर्थन दिल्याने काँग्रेसमध्ये तांबे यांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर नाराजी पसरली आहे.
Maharashtra Congress : आमच्यात कोणतेही वाद नाहीत, महाराष्ट्र काँग्रेस एकसंघ
दरम्यान, बुधावारी (15 फेब्रुवारी) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमच्यात कोणतेही वाद नसल्याचे पटोलेंनी सांगितले. महाराष्ट्र काँग्रेस एकसंघ आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बुधुवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात शेजारी शेजारी बसले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: