Maharashtra Congress President: काँग्रेसमधील खांदेपालट निश्चित! 'महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नाव सुचवा', डिजिटली मतदान
Maharashtra Congress Chief : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नाव सुचवा असं आवाहन प्रदेश काँग्रेस प्रतिनिधींना करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलासाठी खलबतांना वेग आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नाव सुचवा असं आवाहन प्रदेश काँग्रेस प्रतिनिधींना करण्यात आलं आहे. एचके पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती ॲप द्वारे हे डिजिटल मतदान घेतलं जात आहे. दोन दिवस मंथन केल्यानंतर आता डिजिटल मत घेण्याचीही तयारी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी नुकतंच महाराष्ट्रात येऊन काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा कल जाणून घेतला होता. आता एचके पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती ॲपद्वारे हे डिजिटल मतदान घेतलं जात आहे. महाराष्ट्रात 557 प्रदेश प्रतिनिधी आहेत. प्रत्येकाला पसंतीक्रमानुसार मत नोंदवायला सांगितले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसनं नव्या नेतृत्वशोधाच्या हालचाली सुरु केल्यात. हा शोध बिगर मराठा नेतृत्वावर केंद्रीत होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात यांनी स्वत:च राजीनाम्याची तयारी दाखवल्यानंतर महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या राज्यातल्या तीन बड्या काँग्रेस नेत्यांशी त्यांनी खलबतं केली.
काँग्रेसचे मागचे दोनही प्रदेशाध्यक्ष मराठा समाजातले आहेत. नुकतेच मुंबई काँग्रेस अध्यक्ष नेमले गेलेले भाई जगताप हेही मराठाच आहे. नवा प्रदेशाध्यक्षही मराठाच नेमला तर सीएलपी, मुंबई अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशी तीनही पदांवर मराठा होईल. त्यामुळेच बदल करायचाच असेल तर जातीय संतुलनात मग बिगर मराठा चेहरा देण्याची गरज आहे अशी सूचना एका ज्येष्ठ नेत्यानं या बैठकीत केली.
EXCLUSIVE | एच के पाटील यांची थोरात आणि चव्हाणांशी चर्चा, काँग्रेसच्या बैठकीत काय काय झालं?
बाळासाहेब थोरात यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला खरंतर दीडच वर्ष झालं आहे. पण सध्या सीएलपी, महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद ही तीनही पदं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे काँग्रेसमधल्या एका गटानं त्याबाबत ही मोहीम सुरु केली. पण जर बिगर मराठाच समीकरण ग्राह्य धरलं तर या शर्यतीतले अनेक चेहरे आपोआप बाद होतात.
दलित आणि आदिवासींबाबतच्या योजनांना निधी मिळत नाही म्हणून सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलं होतं. त्याची जोरदार चर्चाही झाली. काँग्रेस सर्व घटकांचा विचार करते हे दाखवण्याचा हायकमांडचा तो प्रयत्न होता. महाराष्ट्रात सध्या भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष मराठा आहेत. अशा स्थितीत जो विचार पत्राबाबत केला होता तो नेतृ्वनिवडीबाबतही करुन काँग्रेस सर्वसमावेशकता दाखवणारा का हा प्रश्न आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका, बहुतांश मंत्र्यांची महाराष्ट्र प्रभारींसमोर भूमिका
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण पेटलेलं आहे. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्षही आहेत. एकीकडे हे आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करतो आहे हे महाविकास आघाडी सरकारला दाखवणं आवश्यक आहे. सोबतच इतर जातींचा मतदार जो तुटत चालला आहे, तोही टिकवून ठेवणं काँग्रेसला गरजेचं आहे..फक्त तशी इमेज आणि समाजात स्थान असलेलं नेतृत्व काँग्रेसला मिळणार का हे पाहावं लागेल.