Maharashtra Complete Lockdown LIVE | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारवाईला सुरुवात, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दहा हजारांचा दंड वसूल
Maharashtra Complete Lockdown LIVE Updates : राज्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत अधिक कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असतील. सरकारीसह खासगी कार्यालयात 15 टक्के उपस्थितीची अट आहे. तर सर्वसामान्यांसाठी लोकलसह मेट्रो प्रवास बंद तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे.

Background
राज्यात आजपासून 1 मेपर्यंत कडक निर्बंध, सरकारकडून नव्या नियमांची घोषणा
राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून 'ब्रेक द चेन' अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत. सर्व सरकारी कार्यलयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये 2 तासांच्या आत लग्नकार्य उरकावं लागणार. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय. लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार. किराणामालाची दुकाने, भाजीविक्री सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरु राहणार.
राज्यात बुधवारी विक्रमी 67,438 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात बुधवारी 67 हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 54 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के झाले आहे. राज्यात काल एकूण 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना लस ठरतेय प्रभावी! लसीकरण झालेल्या 0.04 टक्के जणांना कोरोनाची बाधा, केंद्राचा अहवाल
लसीकरणाची मोहिम देखील देशात वेगाने सुरु आहे. तरी देखील अनेकांच्या मनात लसीबद्दल शंका आहे त्यामुळे लोकांच्या मनात आज देखील लस घ्यावी की नाही असा संभ्रम आहे. परंतु केंद्र सरकारने याविषयी आकडेवारी जाहीर करत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राने जाहीर केलेल्या या आकडेवारीनुसार कोरोनाविरुद्धची लस प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु झाल्यानंतर आतापर्यंत 12.7 कोटी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमेत आतापर्यंत एकूण 1.1 कोटी कोवॅक्सिनचे डोस देण्यात आलेत. कोवॅक्सिनचा पहिल्या डोस 93, 56, 437 जणांना दिल्यानंतर यातील 4 हजार 208 म्हणजेच 0.04 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. तर दुसऱ्या डोसनंतर देखील 0.04 टक्के जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर येत आहे.
साताऱ्याच्या हद्दीवर ऑक्सिजनचा टँकर अडवला , सातारा जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्यात वाद
साताऱ्याच्या हद्दीवर ऑक्सिजनचा टँकर अडवला , सातारा जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्यात वाद, ऑक्सिजनचा टँकर आमचा असल्याचा कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा दावा तर सातारा जिल्हाधिकाऱ्यांचाही टॅंकर आमचाच असल्याचा दावा, टँकर पोलीस बंदोबस्तात उभा, साताऱ्याच्या हद्दीवरील घटना, दोन जिल्हाधिकाऱ्यांची उच्च पातळीवर चर्चा सुरू
भिवंडीत पेट्रोल पंपावर वाहनचालकांची मोठी गर्दी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आलाय. मेडिकल सुविधा वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा देणारे दुकानात तसेच पेट्रोल पंप यांना सकाळी 7 ते 11 यादरम्यान दुकान सुरू करण्याची मुभा आहे. त्यामुळे भिवंडीत शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी वाहनचालकांची मोठी गर्दी झाली आहे. 11 नंतर पेट्रोल पंप बंद होणार या भीतीने वाहन चालकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती.























