Maharashtra CM Uddhav Conference :महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेमक्या काय घोषणा करणार? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज (मंगळवार) पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. रात्री आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपलं म्हणणं राज्यातील जनतेसमोर मांडणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करणार? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. . बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आठ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे लॉकडाऊन लावण्याच्या बाजूनं आहेत. तर कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत आहे. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचलं आहे. दरम्यान लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
राज्यात काल 51751 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 52312 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 28,34,473 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 5,64,746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.आज राज्यात 258 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं एकूण 58,245 लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.94% झाले आहे.