Chandrapur : युट्युबच्या माध्यमातून गिरवले ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचे धडे
Maharashtra News : वरोरा तालुक्यातील पाच मित्रांची ही कहाणी असून शेतीच्या प्रयोगासंबंधित समाजमाध्यमांवरील व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याची बाब यामुळे अधोरेखित झाली आहे.
![Chandrapur : युट्युबच्या माध्यमातून गिरवले ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचे धडे Maharashtra Chandrapur News Dragon Fruit Lessons Learned via YouTube Chandrapur : युट्युबच्या माध्यमातून गिरवले ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचे धडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/271c28365be8acea180a5f2b065be631_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंद्रपूर : माहिती तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आलंय किंवा माहिती तंत्रज्ञानामुळे जग आता एक ग्लोबल क्लास रूम झाली आहे हे आपण नेहमी ऐकतो. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील पाच शेतकरी मित्रांनी ही गोष्ट अगदी खरी करून दाखवली आहे. कुठल्याच प्रकारचं प्रत्यक्ष शिक्षण किंवा कार्यानुभव न घेता युट्युबच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट या फळशेतीचे धडे घेत शेतीचा यशस्वी प्रयोग केला. वरोरा तालुक्यातील पाच मित्रांची ही कहाणी असून शेतीच्या प्रयोगासंबंधित समाजमाध्यमांवरील व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याची बाब यामुळे अधोरेखित झाली आहे.
वरोरा तालुक्यात राहणारे मनीष पसारे, सुमित किनाके (आबामक्ता), भूषण ठाकरे (सोनेगाव), अमोल पिसे आणि अमोल महाकुलकर (माढेळी) या पाच शेतकरी मित्रांनी शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा निश्चय केला. या भागातील शेतजमीन ही मुरमाड असल्याने चना-सोयाबीन सारखी पारंपरिक पिकं फायदेशीर ठरत नव्हती. त्यामुळे मुरमाड जमिनीत आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा त्यांचा शोध ड्रॅगन फ्रुट या फळशेतीपाशी येऊन थांबला.
युट्युबच्या माध्यमातून त्यांनी या शेतीबाबत इत्यंभूत माहिती जाणून घेतली. त्यानंतर लातूर-सांगोला या भागात जाऊन ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची खरेदी केली. शेतीमध्ये बेड तयार करून जून महिन्यात दोन फूट अंतरावर या रोपांची ट्रेलर पद्धतीने लागवड करण्यात आली. सध्या या रोपांनी जोम धरला असून साधारण एक वर्षांची झाली की रोपांना फळधारणा व्हायला सुरुवात होईल. साधारण एक एकर लागवडीसाठी त्यांना सात लाखांचा खर्च आला असून पहिल्याच वर्षी चार लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. पुढील 15 वर्ष ही रोपं त्यांना उत्पन्न देणार आहे.
ड्रॅगन फ्रुट हे फळ उष्ण कटिबंधीय असल्यामुळे चंद्रपूर सारख्या अतिशय जास्त तापमान असलेल्या जिल्ह्यात चांगल्याप्रकारे तग धरू शकतं. या शिवाय कॅक्टस वर्गीय असल्यामुळे जंगली जनावरांचा होणारा त्रास देखील या पिकाला फारसा होत नाही. चंद्रपूर जिल्हातील बहुतांशी गावं आणि शेती या जंगलालगत असल्याने ड्रॅगन फ्रूटची लागवड त्यादृष्टीने फायदेशीर ठरू शकते. प्रथिनं-लोह-मॅग्नेशियम यांचं प्रमाण या फळामध्ये खूप जास्त असल्यामुळे आजारानंतर येणाऱ्या अशक्तपणा वर हे फळ फार गुणकारी मानलं जातं. त्यामुळे या फळाला वर्षभर मागणी असल्यामुळे किंमत देखील चांगली मिळते. त्यामुळे या ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीकडे अनेक शेतकरी वळतांना दिसत आहे. समाजमाध्यमांवर निरर्थक कन्टेन्ट पाहून आपला वेळ वाया घालवणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला दिसतात. मात्र अशा प्रकारे समाजमाध्यमाचा वापर करून शेतीचं प्रशिक्षण घेणारे तरुण सर्वांसाठीच प्रेरणा देणारे आहे यात शंकाच नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)