एक्स्प्लोर
महाराष्ट्र भाजप की गंगेचा घाट? पक्षप्रवेशानंतर पापांचं प्रायश्चित्त
सध्या सगळीकडे कमळाचं वारं आहे. तुझ्या गळा माझ्या गळा करताना असे अनेक घोटाळेबाज भाजपनं पावन करुन घेतलेत.
उस्मानाबाद : महाराष्ट्रातली भाजप म्हणजे काशीचा घाट आहे. इथं आलात की तुमच्या पापाचं प्रायश्चित्त तरी होतं किंवा पापांच्या नोंदवहीत झालेल्या पापांच्या नोंदी गायब तरी होतात. भाजपमध्ये दाखल झालेल्या बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, भास्करराव खतगावकर, रामप्रसाद बोर्डीकर... तडीपार झालेले गुंड अशी मोठी यादी आहे. ही मंडळी भाजपात दाखल झाल्यानंतर यांच्या विरोधातल्या प्रकरणांची चौकशी तरी होत नाही किंवा सरळ क्लीन चिट मिळते.
विजयकुमार गावित... आघाडी सरकारमध्ये हे राष्ट्रवादीचे मंत्री होते. 2002 मध्ये संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी आणि राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेत बोगस लाभार्थ्यांना फायदा दिला. पण गेल्या दहा वर्षात ना अटक झाली ना आरोपपत्र दाखल झालं.
फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनी चौकशीची मागणी केली. पण निवडणुकीआधी ते भाजपात आले, आणि चौकशीला कायमचा ब्रेक लागला. मंत्री गावित, आमदार शरद गावित आणि बोगस लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे.
गावितांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा चौकशी अहवाल सीलबंद स्वरुपात हायकोर्टात सादर करण्यात आला. न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच यात एसीबी महासंचालकांनी लक्ष घालून आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश दिले आहेत.
भास्करराव खतगावकर.. अशोक चव्हाणांचे मेहुणे.. खतगावकर नांदेड बँकेचे संचालक होते. 2000 ते 2003 दरम्यान जिल्हा बँकेत जवळपास 350 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्यामध्ये नोकर भरती, संगणक खरेदी, नियमबाहय इमारत भाडं, कमी किमतीत जुन्या वाहनांची विक्री, प्रचलित व्याज दरापेक्षा अधिक दराने ठेवी स्वीकारणे, असे एकूण 23 आरोप तत्कालीन संचालकांवर ठेवण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भास्करराव भाजपात आले.
बँकेच्या लेखा परीक्षणात या सर्व बाबी उघड झाल्या. 25 फेब्रुवारी 2010 रोजी लेखा परीक्षक ए एस गांभिरे यांनी बँकेचे लेखा परीक्षण करुन भाजपचं सरकार आल्यावर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बँकेच्या सर्व संचालकांना क्लीन चिट दिली आहे.
तिसरा चेहरा म्हणजे बबनराव पाचपुते. आदिवासी मंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. शिवाय साईकृपा साखर कारखान्याची 21 कोटीची थकबाकी आहे. भाजप विरोधीपक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी सभागृहात गोंधळ घातला. थकबाकीसाठी अनेकवेळा शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. मात्र दाद न मिळाल्यानं औरंगाबाद खंडपीठानं शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली.
साखर आयुक्तांनी पाचपुतेंची मालमत्ता जप्त करुन लिलाव करुन थकबाकी देण्याचा निर्णय दिला. पण भाजपात आलेल्या पाचपुतेंवर कसलीच कारवाई होत नाही.
तुळजापूरच्या देवानंद रोचकरींनी विधानसभेच्या 5 निवडणुका लढवल्या. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाजपात येण्याआधी त्यांना 5 जिल्ह्यातून हद्दपारीचा प्रस्ताव होता. रावसाहेब दानवरेंनी पुढाकर घेऊन रोचकरींना भाजपात प्रवेश दिला, आणि कारवाईचा कागद पुढं हलला नाही.
सध्या सगळीकडे कमळाचं वारं आहे. तुझ्या गळा माझ्या गळा करताना असे अनेक घोटाळेबाज भाजपनं पावन करुन घेतलेत. यादी करायला शंभर पानी वही कमी पडेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement